प्रेयसी दुसऱ्यासोबत बोलायची म्हणून तरूणानं केलं धक्कादायक कृत्य; स्वत:च दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 08:04 PM2023-03-21T20:04:30+5:302023-03-21T20:04:51+5:30
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.
जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मीरगंज पोलीस स्टेशन परिसरात तरुणीच्या प्रियकराला तरूणीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना प्रेमप्रकरणाशी संबंधित असून मृत तरुणीच्या प्रियकरानेच आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी असेही सांगितले की, तरुणीने दुसऱ्या तरुणाशी बोलणे सुरू केले होते, त्यामुळे तिचा प्रियकर चिडला होता. नकार देऊनही तरुणीने न ऐकल्याने तरूणाने तिला संपवले. सध्या अटक करण्यात आलेल्या तरुणावर पोलिसांकडून आवश्यक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
खरं तर शुक्रवारी जौनपूर जिल्ह्यातील मीरगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असवान गावात एका शेतात मुलीचा मृतदेह सापडला होता. तरुणीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेचा खुलासा करण्यासाठी मीरगंज पोलीस ठाण्याबरोबरच मोरा बादशाहपूर पोलीस ठाण्याचे पोलिसही तैनात करण्यात आले होते. सोमवारी पोलिसांच्या पथकाने प्रयागराज जिल्ह्यातील विरेसॉन गावातील रहिवासी प्रीतम कुमार नावाच्या आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा मृत तरूणीचा दूरचा नातेवाईक असून दोघांमध्ये जवळपास 2 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.
बेशुद्ध करून केली हत्या
पोलिसांच्या चौकशीत आरोपी प्रीतम कुमारने मान्य केले की, त्याची प्रेयसी दुसऱ्या तरुणाशी बोलायची. त्याने तिला अनेकदा समजावले पण तिने ऐकले नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रीतमने तिला फोन करून भेटण्यासाठी बोलावले. प्रीतमने बोलावल्यानंतर मृत तरूणी भेटण्यास तयार झाली. त्यानंतर आरोपीने तिला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. तसेच शेतात बलात्कार केल्यानंतर त्याने तिला काहीतरी खाऊ घातल्याने ती बेशुद्ध झाली. प्रेयसी बेशुद्ध पडल्यावर त्याने तिच्यावर ब्लेडने अनेक वार केले आणि तिचा मृत्यू झाल्यावर तिथून पळ काढला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"