"पत्नी स्पर्श करून देत नाही...", पतीची कोर्टात धाव; 'ती' तृतीयपंथी असल्याचा केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 10:25 PM2023-09-07T22:25:14+5:302023-09-07T22:25:59+5:30
उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील न्यायालयातघटस्फोट घेण्यासाठी एका व्यक्तीने धाव घेतली असून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पत्नी तृतीयपंथी असल्याने घटस्फोट घेत असल्याचे संबंधित पतीने सांगितले. आता न्यायालयाने पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कानपूर येथील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या या व्यक्तीच्या मागणीने नातेवाईक देखील चक्रावून गेले.
दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या व्यक्तीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला आहे की, दोन वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले मात्र लग्नानंतर पत्नीने शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत. ती मला स्पर्श देखील करून देत नाही. डॉक्टरांनी तपासणी केली असता पत्नीच्या शरीराचे अनेक अवयव विकसित झाले नसल्याचे आढळून आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने सीएमओला पाच डॉक्टरांचे पॅनल तयार करून पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सीएमओला तपास अहवाल लवकरच न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
पत्नीच्या माहेरच्यांनी आपली फसवणूक केली असल्याचे म्हणत या प्रकरणी पतीने २०२१ मध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता. परंतु तपासकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी न करताच या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला. आता पतीने या अहवालाला न्यायालयात आव्हान दिले आहे.
कानपूर जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्येष्ठ वकील विजय बक्षी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यानुसार जर पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसेल तर या आधारे घटस्फोट घेता येतो. दरम्यान, संबंधित पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १२ अंतर्गत विवाह रद्द करून वेगळे होण्यासाठी विनंती केली आहे.