मणिपूरमध्ये शांतता करार दुसऱ्याच दिवशी संपुष्टात; मैतेईबरोबर केलेला करार हमार जमातीच्या संघटनेकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 01:10 PM2024-08-04T13:10:23+5:302024-08-04T13:10:49+5:30
...तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.
इम्फाळ : मणिपूरमधील जिरिबाम जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मैतेई व हमार जमातींमध्ये करार होऊन २४ तास उलटायच्या आत त्या ठिकाणी हवेत गोळीबार करण्याच्या तसेच सध्या कोणीही राहत नसलेले घर जाळण्याच्या घटना शुक्रवारी रात्री घडल्या. तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.
जिरिबाममध्ये हिंसाचार उफाळून आल्यानंतर तेथील काही गावांमध्ये मैतेई जमातीच्या लोकांनी आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन केले होते. त्यापैकी एका गावातील घर जाळण्यात आले आहे. हे कृत्य करणाऱ्या सशस्त्र हल्लेखोरांनी हवेत गोळीबारही केला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या गावाकडे धाव घेतली. त्या हल्लेखोरांचा आता कसून शोध सुरू आहे. जिरिबाम येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी मैतेई व हमार या जमातींमध्ये आसाममधील कचर जिल्ह्यात सीआरपीएफ छावणीत गुरुवारी एक करार झाला होता. त्यासाठी जिल्हा प्रशासन, आसाम रायफल्स, सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.
या करारप्रसंगी थाडौ, पायते आणि मिझो जमातीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या सर्वांची पुढील बैठक येत्या १५ ऑगस्टला आयोजिण्यात आली आहे. मैतेईबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याची घोषणा हमार इनपुई या संघटनेने केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आमच्याशी संबंधित गटांनी प्रमुख नेत्यांना कल्पना न देता हा करार करण्यात आला होता असे या संघटनेने म्हटले आहे. करारात सहभागी झालेले लोक हे हमार जमातीचे प्रतिनिधी नाहीत असा दावाह करण्यात आला. शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात २००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता व हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे जवान तैनात ठेवा
मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांमध्ये आसाम रायफल्सचेच जवान तैनात ठेवावेत. त्यांच्याऐवजी सीआरपीएफचे जवान या राज्यात तैनात करू नयेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी कुकी-झो जमातीच्या दहा आमदारांनी त्यांना पत्र पाठवून केली आहे. आसाम रायफल्समधील जवानांना मणिपूरची खडानखडा माहिती आहे. त्याऐवजी या परिसराची फारशी माहिती नसलेल्या दलाचे जवान तैनात केले तर मणिपूरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती कुकी-झो जमातीच्या आमदारांनी या पत्रात व्यक्त केली आहे.