मणिपुरात पाेलिसांचा शस्त्रसाठा लुटला; शस्त्रागार फोडले; एके रायफल, १९ हजार काडतुसे पळविली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 06:59 AM2023-08-05T06:59:49+5:302023-08-05T07:00:20+5:30
दुसऱ्या इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे.
इम्फाळ : मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारनसैना येथे असलेले पोलिसांचे शस्त्रागार जमावाने लुटल्याची घटना शुक्रवारी घडली. शस्त्रागारातील एके तसेच घातक या प्रकारातील रायफली, १९ हजार काडतुसे जमावाने लुटून नेली. दुसऱ्या इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे.
कुकी-झोमी जमातीच्या लोकांचा सामुदायिक दफनविधी होणार असलेल्या जागेच्या दिशेने मोर्चा निघाला होता. या जमावाने पोलिसांच्या शस्त्रागारावर हल्ला चढविला. त्यात एके सिरिजच्या रायफल, घातक प्रकारातील तीन रायफल, एमपी-५ प्रकारातील पाच बंदुका, ९एमएम पद्धतीची १६ पिस्तुले, १९५ सेल्फ लोडिंग रायफल, २५ बुलेटप्रूफ जॅकेट, २१ कार्बाईन्स, १२४ हँडग्रेनेड असा मोठा शस्त्रसाठा जमावाने लुटला आहे.
कुकी-झोमी जमातीच्या लोकांच्या सामुदायिक दफनविधीला मैतेई जमातीने विरोध केला होता. त्यावेळी लष्कर, आरएएफच्या सैनिकांशी मणिपूरमधील निदर्शकांची चकमक झाली होती. इम्फाळमधील आणखी दोन शस्त्रागारे लुटण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.