शहिदांच्या स्मरणार्थ ‘माझी माती, माझा देश’;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:15 AM2023-07-31T09:15:23+5:302023-07-31T09:16:44+5:30
आकाशवाणीवरील ‘मन की बात’च्या १०३ व्या भागात मोदी म्हणाले की, शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शीलालेखदेखील स्थापित केले जातील.
नवी दिल्ली : ‘देशाच्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्यदिनापूर्वी ‘माझी माती, माझा देश’ (मेरी माटी, मेरा देश) मोहीम सुरू केली जाईल,’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केली.
आकाशवाणीवरील ‘मन की बात’च्या १०३ व्या भागात मोदी म्हणाले की, शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शीलालेखदेखील स्थापित केले जातील.
हज यात्रेची सवलत कुणाला?
यावेळी हज यात्रेहून परतलेल्या महिलांचीही अनेक पत्रे आपल्याला मिळाली आहेत, ज्यामुळे मनाला खूप समाधान मिळते, या त्या महिला आहेत ज्यांनी महरमशिवाय हज यात्रा केली. अशा महिलांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. हा मोठा बदल आहे, असे मोदी म्हणाले. यापूर्वी मुस्लिम महिलांना महरमशिवाय ‘हज’ करण्याची परवानगी नव्हती.
देशभरात अमृत कलश
- ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत देशभरात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा देशाच्या काेनाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन दिल्लीत पोहोचेल. देशाच्या विविध भागांतून रोपेही आणली जाणार आहेत. राष्ट्रीय युद्धस्मारकाजवळ कलशातील माती आणि झाडे टाकून ‘अमृत उद्यान’ बांधण्यात येईल.
- हे अमृत उद्यान ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक बनेल. गेल्यावर्षी मी लाल किल्ल्यावरून २५ वर्षांसाठी ‘पंच प्राण’ बोललो होतो. ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे ‘पंच प्राण’ पूर्ण करण्याची शपथही घेणार आहोत.