पळालेल्या चित्त्याला जंगलात पाठवण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इंग्रजीत समजावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 12:42 PM2023-04-03T12:42:49+5:302023-04-03T12:52:41+5:30
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियामधून आणलेले आठ चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आहेत.
भोपाळ - मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेला चित्ता रविवारी सकाळी वनाजवळच्या एका गावातील शेतामध्ये गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर, या चित्त्याला वनात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर, १५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला ओबान या चित्त्याला पुन्हा उद्यानात पाठवण्यात यश आले. सायंकाळी ६ वाजात ओबान परतला अन् वन कर्मचाऱ्यांना सुटकेचा निश्वास टाकला. या दरम्यान, एक मजेशी घटनाही घडली. या चित्त्याला बोलताना वन अधिकाऱ्यांनी इंग्रजीत संवाद साधला.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियामधून आणलेले आठ चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आहेत. त्यापैकी ओबान हा चित्ता जंगलापासून साधारण १५-२० किलोमीटर अंतरावर बरोडा गावाजवळील शेतामध्ये भरकटल्याचे सांगण्यात आले. गेल्याच महिन्यात या चित्त्याला मुक्त अधिवासात सोडण्यात आले होते अशी माहिती शेवपूर विभागीय वनाधिकारी पी. के. वर्मा यांनी दिली. ओबाना हा जंगलातून जवळील विजयपूर गावात पोहोचला होता, येथे शेतात गहू काढणी करत असलेल्या शेतकऱ्यांनी त्याला पाहिलं अन् वन विभागाला कळवलं.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, चित्ता ओबानला परत पाठवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी हिंदीऐवजी इंग्रजी भाषेचा वापर केला. गो ओबान गो.. असे म्हणत त्यांनी ओबाला परत पाठवण्याचा प्रयत्न केला. हा चित्ता विदेशातून आला असल्याने त्याला इंग्रजी भाषा कळत असावी, असा तर्क या कर्मचाऱ्यांनी लावला होता. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
असा पकडला ओबान
चित्त्याला लावण्यात आलेल्या कॉलर उपकरणावरून त्याच्या हालचालींचा माग घेतला जातो. तो शनिवारी रात्री गावाच्या दिशेने गेल्याचे या उपकरणाने घेतलेल्या नोंदीवरून आढळले. रविवारी तो एका जागेवर बसून होता. पोलिसांचे एक पथक त्याच्या हालचालीवर नजर ठेवून होते आणि ग्रामस्थांना दूर ठेवले जात आहे. चित्त्याला जंगलात परत पाठवण्यासाठी वन विभागाने मोठे प्रयत्न केले, अखेर तो जंगलात परतला आणि ग्रामस्थांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, नामिबियाकडून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी चार चित्त्यांना आतापर्यंत मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. ओबानबरोबर आशा, एल्टन आणि फ्रेडी या अन्य तीन चित्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे.