'मला झेड सुरक्षा नको..., गुदमरत जगायचं नाही...!' ओवेसींनी आरोपींसंदर्भात संसदेत केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:56 PM2022-02-04T18:56:20+5:302022-02-04T18:57:28+5:30
मला झेड दर्जाची सुरक्षा नको, तर 'अ' दर्जाचा नागरिक बनवा, असेही ओवेसी म्हणाले...
असदुद्दीन ओवेसी (AIMIM chief Asaduddin owaisi) यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर झालेल्या हल्ल्यावरून संसदेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या मुद्द्यावर बोलताना ओवेसी यांनी सरकारला सवाल केला की, माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर UAPA का लावण्यात आला नाही. 'मी 6 फूट अंतरावरून गोळ्या पाहिल्या आहेत. असेही होऊ शकते की उद्या मी बोलू शकणार नाही. हरिद्वार, रायपूर आणि अलाहाबादमध्ये माझ्याबद्दल काय बोलले गेले नाही. मला झेड श्रेणीची सुरक्षा नको. मला मुक्त जीवन हवे आहे. मला या जगात गुदमरत जगायचे नाही. मला गरिबांसाठी आवाज उठवायचा आहे. गरिबांचा जीव वाचेल तेव्हाच माझा जीव वाचेल.
स्वत:वरील हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, लोकांमध्ये अशा प्रकारचे विष कसे परसवले जात आहे. यावर विचार व्हायला हवा आणि डिरेडिकलाइजेशन व्हायला हवे. मला झेड दर्जाची सुरक्षा नको, तर 'अ' दर्जाचा नागरिक बनवा, असेही ओवेसी म्हणाले.
यावेळी ओवेसी यांनी आपण उत्तर प्रदेशातील प्रचार थांबवणार नाही, असेही सांगितले. ते म्हणाले, मृत्यू तर सर्वांनाच येणार आहे. पण मी गोळीबार करणाऱ्यांना घाबरणार नाही. तुम्ही आरोपींवर यूएपीए लावा. एवढेच नाही, तर पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहिली होती, तेव्हा मीच सर्वात पहिले बोललो होतो. यावर आपण का बोललात, असा प्रश्नही मला सेक्युलर पक्षांनी विचारला होता, असेही ओवेसी म्हणाले.
दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन जणांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या आरोपींनी गुरुवारी दिल्ली-लखनऊ एक्स्प्रेस वेवरील छिजारसी टोल प्लाझा येथे ओवेसींच्या गाडीवर अचानक गोळीबार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस तात्काळ सक्रिय झाले होते. ओवेसी यांनी स्वत: ट्विट करून या संदर्भात माहिती दिली होती.