हृदयद्रावक! आईने ५ वर्षांची मुलगी आणि १८ महिन्यांच्या मुलाला पाण्यात टाकले; नंतर स्वतःही संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 03:22 PM2022-11-20T15:22:27+5:302022-11-20T15:25:35+5:30
राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या दोन मुलांना पाण्यात टाकून स्वत:ही जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. घटना बिरकाली भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय हुसैनाने ५ वर्षांची मुलगी सिमरन आणि १८ महिन्यांचा मुलगा विशाल यांना सर्वप्रथम तलावात टाकले. नंतर संबंधित मुलांच्या आईने देखील तलावात उडी मारून जीवन संपवले.
घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक रघुवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैना या महिलेचा सात वर्षांपूर्वी विकास खान नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. दोघांना दोन मुलेही होती. मात्र हुसैना आणि विकास यांच्यात वारंवार वाद होत होते. घरगुती वादातून हुसैनाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.
तहसीलदाराने केली आत्महत्या
तर, हनुमानगड भागातील जवळील ढोलपूर जिल्ह्यात एका तहसीलदाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, ३५ वर्षीय आशाराम गुर्जर हे करौली जिल्ह्यातील मासलपूर तहसीलमध्ये तैनात होते. माहितीनुसार, गुर्जर यांचा मृतदेह बडी सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गढी जखौडा गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक लोकांनी मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहताच पोलिसांना घटनेची माहिती दिली. गुर्जर यांची नुकतीच अलवरहून करौली येथे बदली झाली असून पदभार स्वीकारल्यानंतर ते दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आले होते. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"