लग्नानंतर ४ वर्षांनंतर महिलेनं ४ जुळ्या मुलांना दिला जन्म; कुटुंबात आनंदाची लहर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 03:18 PM2023-08-28T15:18:56+5:302023-08-28T15:19:42+5:30
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथं खासगी रूग्णालयात एका महिलेनं चार जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. चार वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालं होतं. सध्या महिला आणि तिच्या चारही बाळांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर शालिनी अग्रवाल यांनी सांगितलं की, टोंक जिल्ह्यातील वजीरपुरा येथील रहिवासी किरण कंवर यांना वैद्यकीय समस्यांमुळं लग्नाच्या चार वर्षानंतरही अपत्य झालं नव्हतं. किरण काही महिन्यांपूर्वी आयुष्मान रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचारानंतर ती गरोदर राहिली आणि सोनोग्राफी केली असता ती चार मुलांची आई होणार असल्याचं आढळून आलं. तेव्हापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेवर उपचार सुरू होतं.
२ मुलं आणि २ मुलींना दिला जन्म
दरम्यान, शनिवारी रात्री महिलेनं पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला आयुष्मान रुग्णालयात दाखल केलं. मग महिला डॉक्टर शालिनी अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती केली. महिलेनं जन्म दिलेल्या मुलांमध्ये २ मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे. सध्या तीन नवजात बालकांवर झनाना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक बालक आणि त्याच्या आईवर आयुष्मान रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुटुंबात आनंदाची लहर
लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी घरात पाळणा हलणार असल्याचं कळताच चार मुलांना जन्म देणाऱ्या आई किरण कंवर यांच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला. नवजात बालकांच्या आईचा चेहराच तिची भावना सांगत होता. किरण कंवर यांच्या कुटुंबात तसेच वजीरपुरा गावात आनंदाचे वातावरण आहे. आई आणि मुलांची प्रकृती जाणून घेण्यासाठी गावातील लोक आणि नातेवाईक रुग्णालयात धाव घेत आहेत. त्याचवेळी मुलांचे वडील किसन मोहन सिंग हे देखील खूप आनंदी आहेत. डॉ. शालिनी अग्रवाल यांनी एकाच वेळी चार मुलांची प्रसूती होणं आणि त्यांची प्रकृती ठीक असणं ही दुर्मिळ घटना असल्याचं सांगितलं.