निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलात गळती; देवेंद्र यादव यांचीही पक्षाला सोडचिठी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:36 AM2024-04-18T09:36:36+5:302024-04-18T09:37:55+5:30
तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत.
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा (बिहार): लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला एकामागून एक धक्के बसत आहेत. तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले वृषिन पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर राज्यसभेचे माजी खा. अशफाक करीम यांनीही तिकीटवाटपामुळे नाराजी दाखवत राजदसोबत चार हात लांब होण्याचा निर्णय घेतला. ही जखम अजून भरून निघालेली नसतानाच पक्षाचे आणखी एक मोठे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव यांनीही बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला.
देवेंद्र यादव म्हणाले की, राजदमध्ये जे राजकारण सुरू आहे ते केवळ सत्तेसाठी आहे, त्यात कोणतेही धोरण नाही, तर सत्ता आणि धोरण या दोघांमध्ये सामंजस्य असणे आवश्यक होते. या दोघांमधील सामंजस्य मला दूरदूरपर्यंत दिसत नाही. अशा परिस्थितीत पक्षात राहणे शक्य नाही. मी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्त्वाचाही राजीनामा देत आहे.
बिहारमधील लाखो लोक मतदानापासून राहणार वंचित
निवडणुकीच्या गदारोळात उदरनिर्वाहाच्या शोधात इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांना यावेळीही मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. बिहारच्या प्रत्येक भागातील मजूर प्रत्येक वेळी मतदानापासून वंचित राहतात. यासंदर्भात एका कामगार संघटनेचे राज्य सचिव मुकेश कुमार मुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील लाखो कामगार कामासाठी राज्याबाहेर आहेत. होळीनिमित्त सर्वजण घरी आले होते, मात्र, होळीनंतर ते आपापल्या कामाच्या ठिकाणी परतले. यासंदर्भात बोलताना कुमार म्हणाले की, याबाबत केंद्र सरकारने किमान सात दिवसांच्या सुटीचा नियम लागू करावा. ज्यामुळे इतर राज्यात काम करणारे मजूर त्यांच्या घरी येऊन मतदान करू शकतात.