सहा वर्षांत चक्क १२३ मीटर मागे सरकले ग्लेशियर; एवढा बर्फ वितळला की तयार होतील 3 सरोवरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 11:04 AM2023-07-30T11:04:48+5:302023-07-30T11:05:18+5:30
भारतात लडाख येथेही हा परिणाम जाणवत आहे. या भागातील ग्लेशियर वेगाने वितळत असून पार्काचिक ग्लेशियरच्या आत तीन नव्या सराेवरांची निर्मिती हाेऊ शकते.
नवी दिल्ली : जागतिक तापमान वाढीमुळे जगभरात अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणची ग्लेशियर्स वितळू लागली आहे. भारतात लडाख येथेही हा परिणाम जाणवत आहे. या भागातील ग्लेशियर वेगाने वितळत असून पार्काचिक ग्लेशियरच्या आत तीन नव्या सराेवरांची निर्मिती हाेऊ शकते. तसे झाल्यास या भागात माेठे संकट येऊ शकते, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील स्वायत्त संस्था ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलाॅजी’च्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात प्रदीर्घ अभ्यास केला. त्यांनी त्यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला असून, लडाखमधील हिमालयाचा परिसर, पार्कचिक ग्लेशियर या ठिकाणी हाेत असलेल्या वेगवान परिवर्तनाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
डाॅ. मनीष मेहता यांच्या नेतृत्त्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने १९७१ ते २०२१ या कालावधीतील उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचा वापर केला.
काय आढळले? -
- वर्ष १९७१ ते २०२१ या कालावधीत ग्लेशियर्स वितळून मागे हटले आहेत. हा वेग १९९९ नंतर सहा पटीने वाढला आहे, तर २०१५ नंतर दहा पट अधिक वेगाने ग्लेशियर्स वितळले आहेत.
- १९७१ ते १९९९ या कालावधीत २एमए-१ या गतीने ग्लेशियर्स मागे हटले. १९९९ ते २०२१ दरम्यान ही गति १२एमए-१ एवढी आढळली. २०१५ नंतर हा वेग २०.५एमए-१ एवढा हाेता.
...तर येणार माेठे संकट -
२०१७ मध्येही ग्लेशियरचा माेठा भाग वितळून तुटला हाेता. हा वेग वाढल्यास लडाखमध्ये माेठे संकट निर्माण हाेऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.