सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:42 AM2024-05-05T06:42:43+5:302024-05-05T06:43:09+5:30
प्रज्वलविरोधात लवकरच ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ बजावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू : कथित लैंगिक शोषण व अपहरण प्रकरणात आरोपी असलेले जेडीएस आमदार व माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी (दि. ४) ताब्यात घेतले, असे कर्नाटक पोलिसांनी सांगितले.
न्यायालयाने रेवण्णा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर विशेष तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचा मुलगा खासदार प्रज्वल यालाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्याच्याविरोधात सीबीआय लवकरच ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी करण्याची
शक्यता आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी कथित लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी प्रज्वलला अटक करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. तसेच सध्या विदेशात पलायन केलेल्या प्रज्वलच्या प्रत्यार्पणासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
कधी बजावतात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’?
आंतरराष्ट्रीय पोलिस संस्थेद्वारे (इंटरपोल) एखाद्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्तीची ओळख, स्थान किंवा हालचालीबद्दल सदस्य देशांकडून अतिरिक्त माहिती संकलित करण्यास ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली जाते.
राहुल गांधींचे पत्र
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना पत्र लिहून या प्रकरणातील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे. गांधी यांनी पत्रात म्हटले की, मी आपल्याला पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती करतो. ते (पीडित) आपल्या सहानुभूती आणि पाठिंब्यासाठी
पात्र आहेत.