‘लाचखोरीचा खेळ’ नव्हे, तर दीडपट अधिक नोकऱ्या; PM नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:52 AM2024-02-13T06:52:38+5:302024-02-13T06:52:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नियुक्तिपत्रांचे वाटप, मागील १० वर्षात सध्याच्या सरकारने १.५ पट अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत.
नवी दिल्ली - संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या १० वर्षांच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने दीडपट अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
रोजगार मेळाव्यात नुकत्याच भरती झालेल्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, त्या काळात नोकऱ्यांसाठी जाहिराती दिल्या जात होत्या. त्यासाठी खूप वेळ लागायचा. नियुक्ती झाल्यापासून ते नियुक्तिपत्र मिळेपर्यंत आणि याचा फायदा घेत ‘लाचखोरीचा खेळ’ही रंगायचा.
आम्ही भारत सरकारमधील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक केली आहे. एवढेच नव्हे तर भरती प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सरकार खूप आग्रही आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला आपली क्षमता सिद्ध करण्याची समान संधी मिळत आहे. आज प्रत्येक तरुणाला मेहनत आणि कौशल्याने नोकरी मिळू शकते, असा विश्वास आहे. मागील १० वर्षात सध्याच्या सरकारने १.५ पट अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत.
स्टार्टअप पोहोचले १.२५ लाखांवर
निमलष्करी दलात अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. निमलष्करी दलातील भरती प्रक्रियेसाठी आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेतली जाईल. यामुळे लाखो उमेदवारांना परीक्षेत समान संधी मिळणार आहे. आज भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था. देशातील स्टार्टअपची संख्या आता सुमारे १.२५ लाखांवर पोहोचली आहे. त्यातून तरुणांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होत आहेत. देशात सुरू असलेल्यानवीन रेल्वे, रस्ते, विमानतळ आणि जलमार्ग प्रकल्पांमुळे रोजगाराच्या नवीन संधी.
आज रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रेल्वेतही भरती केली जात आहे. प्रवासाच्या बाबतीत रेल्वे ही सर्वसामान्यांची पहिली पसंती आहे. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या ४०,००० आधुनिक बोगी तयार केल्या जातील आणि सामान्य गाड्यांमध्ये जोडल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांच्या सोयी आणि आरामात वाढ होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.