गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 08:30 AM2024-02-11T08:30:42+5:302024-02-11T08:31:04+5:30

देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत. 

In the last 5 years, India has seen reform, perform, transform - Narendra Modi | गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी

गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : १७व्या लोकसभेची पाच वर्षे हा रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मचा (सुधारणा, कामगिरी, परिवर्तन) काळ होता. आता देश वेगाने मोठ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत ‘गेम चेंजर’ सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे २१व्या शतकातील समर्थ भारताचा भक्कम पाया निर्माण झाला. देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत. 

१७व्या लोकसभेचे हे अंतिम अधिवेशन व तसेच शनिवारी शेवटची बैठक होती. त्याप्रसंगी मोदी म्हणाले की, देशात एकच संविधान असावे अशी जनतेची इच्छा होती. मात्र कलम ३७० रद्द करून ती इच्छा प्रत्यक्षात साकार केली. त्यामध्ये अनेक संकटे आली, पण त्यावर मात करून देशाने योग्य मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवली. 

‘कोरोनाच्या साथीचा समर्थपणे मुकाबला’
मोदी यांनी सांगितले की, शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा म्हणजे कोरोनाच्या साथीचा देशाने मुकाबला केला. या बिकट काळात संसदेच्या कामकाजावर विपरित परिणाम होणार नाही याची काळजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली होती. संसदेसाठी नवी इमारत हवी अशी चर्चा यापूर्वी अनेकदा केली जायची, पण लोकसभा अध्यक्षांनी यासंदर्भात ठाम निर्णय घेतला. संसदेची नवी इमारत साकारली. लोकसभेत सेंगोलची झालेली प्रस्थापना ही विशेष घटना आहे. 

ओम बिर्ला यांचा चेहरा नेहमी हसतमुख 
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व खासदारांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, लोकसभेत कोणतीही स्थिती उद्भवली तरी ओम बिर्ला यांचा चेहरा कायम हसरा असायचा. त्यांनी या सभागृहाचे कामकाज निष्पक्षपाती पद्धतीने चालविले. काही वेळा आरोप, प्रत्यारोप तसेच संताप, उद्वेगाचेही प्रसंग लोकसभेत घडले. पण ती परिस्थिती बिर्ला यांनी अतिशय कुशलतेने हाताळली. 

‘९७ टक्के कामकाज व्यवस्थित पार पडले’
१७व्या लोकसभेत ९७ टक्के कामकाज व्यवस्थित पार पडले. १८व्या लोकसभेत १०० टक्के कामकाज नीट पार पडावे, त्यातून जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. महिला आरक्षण विधेयक, त्रिवार तलाकवर घातलेली बंदी ही विधेयके संसदेत संमत झाली होती. त्याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. 

१७ व्या लोकसभेत  सर्वांत कमी बैठका
लोकसभा व राज्यसभेचे कामकाज शनिवारी तहकूब करण्यात आले. संसदीय निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पार पडलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १७ व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन होते. गेल्या पाच वर्षांत सर्वांत कमी बैठका झाल्या असे पीआरएस या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०१९-२०२४ या कालावधीत लोकसभेच्या २७२ बैठका झाल्या. १४ व १५ व्या लोकसभेच्या अनुक्रमे ३३२, ३५६ बैठका झाल्या. 

१६ व्या लोकसभेच्या ३३१ बैठका झाल्या होत्या. १३ व्या लोकसभेच्या ३५६ बैठका झाल्या. १९५२ ते १९५७ या कालावधीत पहिल्या लोकसभेच्या ६७७ बैठका झाल्या. तो विक्रम आजही कायम आहे. सरकारने अनेक गोष्टीत सुधारणा केल्या, उत्तम कामगिरी बजावली, त्यामुळे देशात महत्त्वाचे बदल झाले, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

Web Title: In the last 5 years, India has seen reform, perform, transform - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.