पुढील काही वर्षात जम्मू-काश्मीरचे रस्ते अमेरिकेसारखे; गडकरींनी दिली डेडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 08:20 PM2023-04-10T20:20:27+5:302023-04-10T20:27:19+5:30
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या एका विधानाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी देशवासीयांना अमेरिकेप्रमाणे रस्ते देण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे
श्रीनगर - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत देशातील रस्त्यांबाबतचा 'रोडमॅप' सादर केला होता. २०२४ च्या आधी भारतातील रस्ते अमेरिकेसारखे बनतील, अशी मोठी घोषणाच यावेळी गडकरी यांनी केली होती. तसेच, श्रीनगर ते मुंबई हे अंतर रस्तेमार्गे अवघ्या २० तासांत कापता येईल, असा दावाही त्यांनी केला. आता, काश्मीर दौऱ्यावर असलेल्या गडकरींनी जम्मू-काश्मीरमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होतील, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्याची डेडलाईनही सांगितलीय.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या एका विधानाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी देशवासीयांना अमेरिकेप्रमाणे रस्ते देण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे. 'अमेरिका श्रीमंत देश आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत असे नाही. अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे', असे जॉन केनेडी म्हणायचे. केनेडी यांचे हे वाक्य मी नेहमी ध्यानात ठेवतो, असे सांगत गडकरी यांनी २०२४ वर्ष समाप्त होण्याआधी भारतातील रस्तेही अमेरिकेच्या तोडीचे होतील, असा विश्वास दिला होता.
त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा गडकरी यांनी अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे देशातील रस्ते होतील, असे म्हटले आहे. काश्मीर येथील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना, जम्मू-काश्मीरमधील रस्ते पुढील ३ ते ४ वर्षांत अमेरिकेप्रमाणे होतील, असे गडकरी यांनी म्हटलंय. तसेच, देशातील रस्ते नेटवर्क सर्वाधिक चांगलं बनवू असेही गडकरींनी यावेळी म्हटलंय.
#WATCH सड़क इंफ्रास्ट्रक्चर में अगले 3-4 साल में जम्मू-कश्मीर के सड़क इंफ्रास्ट्रक्चर को अमेरिका के बराबर बनाएंगे। हम इतना अच्छा सड़क नेटवर्क बनाएंगे, इस काम को लेकर हम कार्य कर रहे हैं: केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी pic.twitter.com/uo5NhOUZPs
— ANI_HindiNews (@AHindinews) April 10, 2023
दरम्यान, गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच रस्ते विकासाचा रोडमॅपच संसदेत सादर केला होता. दिल्लीतून जवळच्या राज्यांतील अनेक शहरं केवळ दोन तासांत गाठता येतील. येत्या डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्णत्वास येतील. दिल्ली-अमृतसर अंतर ४ तासांत कापता येईल. दिल्ली-मुंबई हे अंतर १२ तासांत कापता येणार असून हे कामही येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे, असे गडकरी म्हणाले. दक्षिणेत चेन्नई-बेंगळुरू हा मार्ग होत असून नव्याने निर्माण होत असलेल्या रस्त्यांची ही यादी मोठी असल्याचेही गडकरींनी म्हटले होते.
Interacting with Media on the progress of NH projects in Jammu & Kashmir including Zojila and Z- Morh Tunnel, Srinagar. #ZojilaTunnel#ZMorhTunnel#AllWeatherRoad#PragatiKaHighway#GatiShakti#BuildingTheNationhttps://t.co/z2MRgBx7jn
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 10, 2023
अब्दुल्लांच्या प्रश्नालाही दिलं होतं उत्तर
फारूख अब्दुल्ला यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील कामांची जंत्रीच सादर केली. जम्मू काश्मीरमध्ये ६० हजार कोटींची कामे सुरू आहेत. जोजिला टनेलचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. तिथे उणे तापमानात सुमारे एक हजार कामगार काम करत आहेत. २०२६ च्या ऐवजी २०२४ च्याआधी या टनेलचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. मनालीत अटल टनेल बनल्याने तीन तासांचं अंतर आता आठ मिनिटांत कापता येत आहे. लडाख लेहहून थेट कारगिल, कारगिल ते झेरमोर, झेरमोर ते श्रीनगर आणि श्रीनगर ते जम्मू महामार्ग बनत आहे. यात एकूण पाच टनेलचे काम सध्या सुरू आहे, असे गडकरी म्हणाले.