‘ती’च्या नादात लष्करातील मेजरने पाक एजंटला दिली गोपनीय माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:45 AM2023-12-05T06:45:07+5:302023-12-05T06:45:35+5:30
लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या तपासात आले समोर
नवी दिल्ली : पाकिस्तानी एजंटशी सतत संपर्क साधून त्याला महत्त्वाची गुप्तचर माहिती देणाऱ्या लष्करातील मेजरने फेसबुकच्या माध्यमातून आरुषी आकाश या महिलेशी वारंवार संपर्क साधला होता, अशी माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या तपासात समोर आली आहे.
मेजरवर संशय बळावल्याने त्याची चौकशी केली असता, या प्रकरणातील संपूर्ण गूढ उघड झाले. हा मेजर स्ट्रॅटेजिक फोर्सेस युनिटमध्ये तैनात होता आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
तपासात नेमके काय आढळले?
तपासानुसार, याच काळात मेजर मार्च २०२२ मध्ये पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी आरुषी आकाशच्या संपर्कात आला होता. दोघांमध्ये फेसबुकवरच संपर्क होता. मेजरच्या हेरगिरीचा पर्दाफाश झाला तेव्हा त्याच्याकडून मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. एक हार्ड ड्राइव्हही जप्त करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींची फॉरेन्सिक तपासणी केली असता, त्यात अनेक महत्त्वाची माहिती असून ती त्याने पाकिस्तानच्या एजंटला पाठवल्याचे आढळून आले.
अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये तैनात...
आता या माजी लष्करी अधिकाऱ्याने सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या खंडपीठात अपील दाखल केले आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्याला आता हवी आहे. आरोपी ११ वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये तैनात होता. तो आर्टिलरी रेजिमेंटमध्येही तैनात होता. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्याची नियुक्ती करण्यात आली होती.