Corona Virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट, ऑक्सीजन सप्लाय-व्हेटिलेटरसंदर्भात राज्यांना दिले असे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 03:11 PM2022-12-24T15:11:44+5:302022-12-24T15:14:16+5:30
प्रवाशांना आरटी-पीसीआर रिपोर्ट द्यावा लागेल. विमानतळावर त्यांचे थर्मल स्कॅनिंग होईल आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास बाधितांना क्वारंटाईन केले जाईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. कोरोना संकटात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करण्यासंदर्भात आरोग्य सचिवांनी राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आरोग्य सचिवांनी राज्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मशीन दुरुस्त करण्यास सांगितले आहे. यातच, आजपासून विमानतळांवर रँडम टेस्टिंग देखील सुरू केली आहे. ज्या प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोरोनाचा सब व्हेरिअंट BF.7 ने चीनमध्ये हाहाकार माजला आहे. यामुळे भारती अलर्ट मोडवर आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निवेदन -
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज (शनिवारी) सांगितले की, परदेशातून आलेले प्रवासी ट्रॅक केले जातील. प्रवाशांना आरटी-पीसीआर रिपोर्ट द्यावा लागेल. विमानतळावर त्यांचे थर्मल स्कॅनिंग होईल आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास बाधितांना क्वारंटाईन केले जाईल.
बूस्टर डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी -
दरम्यान, वृत्त आहे की, लखनऊमध्ये रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांवर जाऊन लोक मोठ्या प्रमाणात बूस्टर डोस घेत आहेत. लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर, बहुतेक लोक बूस्टर डोस देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्याची भीतीने लोक लसीकरण केंद्रांवर जाऊन बूस्टर डोस घेत आहेत.
कोरोनाचा धोका वाढला -
चीन, जपान आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. हे पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने लोकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ज्यांनी अद्याप बूस्टर डोस घेतलेला नाही त्यांना बूस्टर डोस घेण्यास सांगण्यात आले आहे.