धक्कादायक! मोबाईलवर कार्टून बघता बघता ५ वर्षीय मुलीचा Heart Attack नं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 05:45 PM2024-01-21T17:45:59+5:302024-01-21T17:46:30+5:30
या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे
यूपीच्या अमरोहामध्ये ५ वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि जमिनीवर पडला. आईनं मुलीला पाहिले तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला. घाबरलेल्या कुटुंबाने मुलीला गावातील डॉक्टरांकडे नेले, तेथे मुलीला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे.
ही घटना हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावातील आहे. जिथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महेश खरगवंशी यांची ५ वर्षांची मुलगी कामिनी अंथरुणात बसली होती. ती आई सोनियासोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती खाली पडली. आधी आईला वाटलं ती मुद्दामाहून असं करत असेल. पण जेव्हा तिला हलवलं तेव्हा तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आई घाबरली. ती जोरजोरात ओरडू लागली तेव्हा कुटुंबीय आणि आसपासचे लोक तिथे जमले. त्यांनी तातडीने मुलीला गावातील डॉक्टरांना दाखवण्यास नेले. तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.
या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचा पाचवा वाढदिवस ३० जानेवारीला साजरा होणार होता. या घटनेवर आई म्हणाली की, मुलगी बेडवर बसून मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक तिझ्या हातातून मोबाईल निसटला. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत खेळल्यानंतर तिने जेवण केले असं आईनं म्हटलं.
दरम्यान, ज्याप्रकारे घटनेची माहिती दिली जात आहे, त्या मुलीचा अचानक मृत्यू झाला, तो हृदयविकाराच्या झटक्याने असू शकतो. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. जे आता शक्य नाही. सध्या घरातील लोक जे सांगतात त्यावरच विश्वास ठेवता येईल असं मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.