उत्तर प्रदेशात आता विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी; ३६ जागांवर निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:35 AM2022-03-15T09:35:35+5:302022-03-15T09:35:53+5:30
भाजप, सपा लवकरच जाहीर करणार उमेदवार
- राजेंद्र कुमार
लखनऊ : उत्तर प्रदेशात आता विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी राजकारण सुरू झाले आहे. विधान परिषदेच्या ३६ जागांसाठी विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि सपा लवकरच आपले उमेदवार जाहीर करतील. यासाठी १५ मार्चरोजी अधिसूचना जारी होणार आहे.
या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० आणि दुसऱ्या टप्प्यात सहा जागांची निवडणूक होईल. यासाठी १५ ते २२ या काळात अर्ज दाखल केले जातील. ९ एप्रिल रोजी मतदान होईल, तर, १२ एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल. सध्या विधानपरिषदेत सपाचे ४८ जागांसह बहुमत आहे, तर, भाजपच्या ३६ जागा आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान करतात. या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे असा अंदाज आहे की, १८ व्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडे दोन्ही सभागृहात बहुमत असेल. भाजपचे सहकारी पक्ष अपना दल (स) व निषाद पार्टी आणि सपाचे सहकारी रालोद हे एक- एक उमेदवार मैदानात उतरवू शकतात. त्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.