VIDEO: फुगा मारताच हायवेवर भरधाव रिक्षा उलटली; धुळवडीच्या दिवशी भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 06:47 AM2022-03-20T06:47:17+5:302022-03-20T08:16:22+5:30
प्रवाशांनी भरलेली रिक्षा हायवेवर उलटली; धुळवडीच्या दिवशी झाला अपघात
बागपत: उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये एक अपघात झाला आहे. धुळवडीच्या दिवशी झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी द्रुतगती मार्गावरून एक रिक्षा भरधाव वेगानं जात होती. त्याचवेळी तिथे धुळवड खेळत असलेल्या तरुणांनी पाण्यानं भरलेला फुगा रिक्षाच्या दिशेनं फेकला. त्यानंतर चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि ती उलटली.
रिक्षा बागपतहून दिल्लीला जात असताना तिला अपघात झाला. रिक्षात बरेच प्रवासी होते. रिक्षा काठा गावाजवळ पोहोचली, तेव्हा तिथे काही तरुण धुळवड खेळत होते. त्यांनी रंगीत पाण्यानं भरलेला फुगा रिक्षाच्या दिशेनं फेकला. फुगा रिक्षावर आदळू नये यासाठी चालकानं प्रयत्न केले. याच प्रयत्नात त्याचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि ती द्रुतगती मार्गावर उलटली.
होली का गुब्बारा जानलेवा हो सकता है.... pic.twitter.com/SSfQz1bjNw
— Chandra Prakash (@cprakash82) March 19, 2022
रिक्षा उलटताच धुळवड खेळत असलेले तरुण घाबरले. सुदैवानं रिक्षातील प्रवाशांना दुखापत झाली नाही. अपघात होताच प्रवासी रिक्षाबाहेर आले. त्यांनी रिक्षा सरळ केली आणि दिल्लीच्या दिशेनं निघाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अद्याप तरी कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रार प्राप्त होताच कारवाई करू, असं त्यांनी सांगितलं.