सलाम! रेल्वे रुळाला पडलेला तडा पाहून महिलेनं साडी सोडून ट्रॅकवर बांधली; मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:31 PM2022-04-01T13:31:47+5:302022-04-01T13:33:25+5:30
महिलेच्या प्रसंगावधानामुळे वाचले रेल्वे प्रवाशांचे प्राण; महिलेचं सर्वत्र कौतुक
आग्रा: एटाहून आग्र्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा अपघात टळला आहे. एका महिलेनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे. अवागढमधल्या नगला गुलरियाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. जवळच राहत असलेल्या ओमवती नावाच्या महिलेनं तडा पाहिला. तिला संभाव्य धोका लक्षात आला. तिनं वेळीच चालकाला इशारा दिला. त्यामुळे अपघात टळला.
गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ओमवती शेतात जात होत्या. ओमवती यांचं शेत रेल्वे रुळांच्या जवळ आहे. त्याचवेळी ओमवतींना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं दिसलं. अवागढच्या दिशेनं जाणारी ट्रेन तिथून पुढल्या काही क्षणांत जाणार होती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ओमवती यांनी स्वत:ची लाल रंगाची साडी सोडली आणि ती रेल्वे रुळांच्या मधोमध बांधली. त्यामुळे मोटरमनला धोका लक्षात आला. त्यानं वेळीच ब्रेक लावले आणि ट्रेन थांबली.
एटा रेल्वे स्टेशनमधून सकाळी साडे सात वाजता १५० प्रवाशांना घेऊन ट्रेन आग्र्याला रवाना झाली. ट्रेन ज्या रुळांवरून जाणार होती, त्याला तडा गेला होता. ही बाब ओमवती यांच्या वेळीच लक्षात आल्यानं आणि त्यांनी प्रसंगावधान राखल्यानं अपघात टळला. याबद्दल मोटरमननं ओमवती यांचं कौतुक केलं आणि त्यांना १०० रुपये बक्षीस म्हणून दिले.
गुलरिया भागात रुळाला तडा गेल्याची माहिती मोटरमननं रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर किमॅन आणि अन्य कर्मचारी दुरुस्तीसाठी पोहोचले. जवळपास अर्ध्या तासात दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आणि ट्रेन आग्र्याच्या दिशेनं रवाना झाली.