हृदयद्रावक! कडाक्याच्या थंडीमुळे पत्नीचा मृत्यू; गरीब शेतकऱ्यावर भीक मागून अंत्यसंस्कार करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 12:05 PM2023-01-08T12:05:25+5:302023-01-08T12:06:53+5:30
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये थंडीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातीलशाहजहांपूरमध्ये थंडीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या पतीने भीक मागून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. खरं तर पती लोकांकडे भीक मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पती थंडीमुळे पत्नीच्या मृत्यूचे कारण सांगत असले तरी दुसरीकडे मात्र प्रशासन थंडीमुळे मृत्यूचे कारण मानत नसून अन्य काही कारण देत आहे.
दरम्यान, गंगाराम या वृद्ध व्यक्तीची 48 वर्षीय पत्नी गीता देवी यांचा थंडीमुळे मृत्यू झाला. गंगाराम यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सरकारी मदतीसाठी गंगाराम यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारल्या, पण मदत मिळू शकली नाही. गंगाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते खूप गरीब आहेत. त्यांच्याकडे ना रेशनकार्ड आहे, ना भांडी ना उदरनिर्वाह करण्याचे कोणते साधन. त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांची पत्नी मानसिकदृष्ट्या कमकुवत होती. पत्नीच्या मृत्यूनंतर गंगाराम यांनी गावातील लोकांकडून पैसे मागून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
थंडीमुळे नाही तर अन्नाअभावी मृत्यू - एसडीएम
याप्रकरणी एसडीएम हिमांशू उपाध्याय यांनी म्हटले, "आम्ही नायब तहसीलदारांना तिथे पाठवले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचा मृत्यू थंडीमुळे नाही तर जेवण न केल्यामुळे झाला आहे. गंगाराम यांच्या आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत शक्य ती सर्व मदत केली जाईल आणि त्यांच्या शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"