मुलानं मुलीला पळवून नेलं अन् गावकऱ्यांनी आईची काढली नग्न धिंड, कर्नाटकातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:55 PM2023-12-12T12:55:23+5:302023-12-12T12:55:48+5:30
मुलाने मुलीला पळवून नेलं म्हणून ग्रामस्थांनी तरूणाच्या आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केली.
नवी दिल्ली : लाजिरवाणी आणि संतापजनक घटना कर्नाटकातील बेलगी जिल्ह्यातील छोट्याश्या गावात घडली. मुलानं मुलीला पळवून नेलं म्हणून ग्रामस्थांनी तरूणाच्या आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. संतप्त गावकरी इथेच थांबले नसून त्यांनी त्या माऊलीची नग्न अवस्थेत धिंड देखील काढली. जमावानं महिलेच्या घराची तोडफोड केली आणि तिला नाहक त्रास दिला. कर्नाटकातील वंटामुरी गावात घडलेल्या या भयावह घटनेनंतर गावातील काही कुटुंबीयांनी स्थलांतराचा पर्याय निवडला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून पीडित महिलेची सुटका केली.
खरं तर पोलीस गावात आले तेव्हा पीडित महिलेला वीजेच्या खांबाला बांधून ठेवले होते. पोलिसांनी तिला जवळच्या इस्पितळात दाखल करून अधिक तपास सुरू केला. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सिद्धरामप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून गेलेल्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले होते. पण, २४ वर्षीय अशोक आणि १८ वर्षीय प्रियंका यांचे प्रेमसंबंध होते. लग्न ठरले असताना प्रियंका अशोकसोबत पळून गेल्याने स्थानिकांनी अशोकच्या आईवर राग काढला.
अमानवीय घटना घडताच अनेकांनी सोडलं गाव
दरम्यान, स्थानिक पोलीस पळून गेलेल्या अशोक आणि प्रियंका यांचा शोध घेत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावात अशी अमानवीय घटना घडल्यानंतर अनेक जण वंटामुरी सोडून निघून गेले. तरूणीच्या कुटुंबीयांनी घातलेला हा गोंधळ रात्रभर सुरू होता. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा मुलीकडील काही मंडळी पुन्हा एकदा हल्ला करण्याच्या इराद्याने आली होती. पण, खाकी वर्दी पाहताच त्यांनी पळ काढला.