Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा

By श्रीनिवास नागे | Published: May 5, 2023 07:01 PM2023-05-05T19:01:57+5:302023-05-05T19:03:08+5:30

मुस्लिमबहुल मतदारसंघात कट्टर हिंदुत्ववादी आमदार

In Vijaypur (Bijapur) district Congress leader M. B. Discussion between Patil and BJP leader Basangowda Patil-Yatnal | Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा

Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा

googlenewsNext

श्रीनिवास नागे

विजयपूर : ‘ते’ दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत, दोघेही एका शहरातील, दोघांचे पक्ष वेगवेगळे, पण दोघांची दोस्ती; त्यामुळे त्यांच्यात कधीच निवडणुकीची कुस्ती झालेली नाही! ऐतिहासिक विजयपूर (विजापूर) जिल्ह्यात या दोघांचीच जोरदार चर्चा. काँग्रेसचे नेते एम. बी. पाटील आणि भाजपचे नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची ही कथा...

कर्नाटकातील काँग्रेसमध्ये सध्या सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बबलेश्वरचे आमदार एम. बी. पाटील यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले गेले आहे. त्याचवेळी भाजपमधून विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आसुसलेले आहेत.

विजयपूर जिल्ह्यात हे दोघे नेते बलवान समजले जातात. एम. बी. पाटील काँग्रेसमधील गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय आहेत. राजीव गांधी फाउंडेशनचे ते प्रमुख आहेत, तर बसनगौडा पाटील यांचा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क असतो.

बंगळुरू येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा सर्व खर्च एम. बी. पाटील यांनी उचलल्याचे बोलले जाते, तर यत्नाळ यांनी उत्तर कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांची जबाबदारी घेतली आहे. विरोधकच नव्हे तर पक्षातील नेत्यांवरही ते तोंडसुख घेतात. माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या विरोधात त्यांनीच आवाज उठविला होता.

काँग्रेस सरकारमध्ये गृह, जलसंपदा अशी खाती सांभाळणारे एम. बी. पाटील महाराष्ट्राच्या सीमेवरील बबलेश्वर मतदार संघातील आमदार आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागाला त्यांनीच तुबची-बबलेश्वर योजनेतून सायफन पद्धतीने पाणी देऊन कुरापत काढली होती.

मुस्लिमबहुल मतदारसंघात कट्टर हिंदुत्ववादी आमदार

भाजपचे बसनगौडा पाटील हे कट्टर हिंदुत्ववादी नेते आहेत. विजयपूर शहरात मुस्लिम मतदारांची संख्या ३० टक्के असूनही ते निवडून येतात. यामागचे मुख्य कारण एम. बी. पाटील आणि त्यांची दोस्ती आहे, असे बोलले जाते.

त्यांच्याविरोधात काँग्रेस नेहमीच कमजोर उमेदवार देते. बबलेश्वरमध्ये एम. बी. पाटील यांच्याविरोधात भाजपच्या विजूगौडा पाटील यांनी तीनवेळा पराभवाची नामुष्की स्वीकारली आहे. विशेष म्हणजे ते काँग्रेसचे माजी मंत्री तथा बसवनबागेवाडी येथील उमेदवार शिवानंद पाटील यांचे बंधू आहेत. बसनगौडा आणि एम. बी. पाटील या दोघांची दोस्ती पाहता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे या काँग्रेस-भाजपच्या नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

दोस्तीसाठी सोयीचे मतदारसंघ

दोघे एकाच म्हणजे विजयपूर शहरात असूनही एकमेकांविरोधात कधीही उभे राहिलेले नाहीत. विजयपूर शहराची लोकसंख्या साडेचार ते पाच लाखांपर्यंत आहे. विधानसभेचा शहर मतदारसंघ वगळता शहरातील उर्वरित भाग बबलेश्वर मतदारसंघाला जोडलेला आहे.

दहा दिवसातून एकदा पाणी

आलमट्टी धरणाचे पाणी आल्यामुळे शहराशेजारी ऊसासोबत द्राक्ष आणि डाळींब बागा मोठ्या प्रमाणात आहेत. शहराला ४० किलोमीटरवरील कोलार येथून पाणी पुरविले जाते, पण नियोजनाअभावी दहा दिवसातून एकदा पाणी येते. विजयपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे, परंतु गेल्या आठ महिन्यांपासून महापौरपद रिक्त आहे. बसनगौडा पाटील यांनी विमानतळ मंजूर करून आणले आहे. बेदाण्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्यांच्या पुढाकाराने होत आहे. परंतु, जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आलेला नाही.

Web Title: In Vijaypur (Bijapur) district Congress leader M. B. Discussion between Patil and BJP leader Basangowda Patil-Yatnal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.