वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 10:51 PM2017-11-03T22:51:40+5:302017-11-03T22:52:58+5:30
नवी दिल्ली : वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नवी दिल्ली : वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अन्न प्रक्रिया उद्योगात नवनवीन संधी शोधली जात आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रात अग्रेसर असून याचे प्रतिबिंब या महाराष्ट्र दालनात उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फुंडकर यांनी सांगितले.
वर्ल्ड फूड इंडिया 2017चे आयोजन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने इंडिया गेट येथे करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र दालन उभारण्यात आलेले आहे. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, कृषी, फलोत्पादन पणन मंत्री राज्यमंत्री सदाशिव खोत, कृषी विभागाचे सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त डॉ. सचेंद्रप्रताप सिंग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्रा यासह कृषी, पणन, विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध दालनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या दालनामध्ये शासनाचे तसेच खासगी अन्न प्रक्रिया उद्योजकांचे एकूण 21 दालने उभारण्यात आलेली आहेत. खाद्य प्रक्रिया, जास्त काळ टिकविण्यासाठी वापरण्यात येणा-या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली फळे, रस, अन्य पदार्थांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. या दालनाचे संकल्पनाचित्र तसेच आतील सजावट जे. जे. स्कूल ऑफ ऑर्टच्या चमूने केलेली आहे.
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे इंडिया गेट येथे 3ते 5 नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2017 प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ञ सहभागी झालेले आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक व व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने, वर्ल्ड फूड इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर, अरमेनिया या देशाचे राष्ट्रपती, तसेच लटविया या राष्ट्राचे प्रधानमंत्री यावेळी उपस्थित होते. या मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास तसेच कृषी, फलोत्पादन पणन मंत्री राज्यमंत्री उपस्थित होते. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात महाराष्ट्रासह अन्य राज्य सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध राष्ट्र तसेच जगभरातील 2000 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
इज ऑफ डुइंगअंतर्गत महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाचे राष्ट्रीय मंचावरून कौतुक
इज ऑफ डुइंगअंतर्गत महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाचे राष्ट्रीय मंचावरून कौतुक करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या नवउद्योग धोरणामुळे अनेक राष्ट्रांनी राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगत गुंतवणूक केली आहे. याबाबत आजच्या मुख्य उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रीय मंचावरून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी कौतुक केले. या कार्यक्रमात निवेश बंधू या गुंतवणूक संकेत स्थळाचे सुरुवात प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये देशभरातील सर्वच राज्यांच्या अन्न प्रक्रियेविषयीची माहिती या संकेत स्थळावरून मिळणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात काय खास अन्न प्रक्रिया उद्योग आहेत याची सविस्तर माहिती तसेच कुठे गुंतवणूक करण्यास वाव आहे, याबाबतही माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.