स्वदेशी सुपरसॉनिक विमानावर हनुमान, मोदींच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 08:03 AM2023-02-14T08:03:58+5:302023-02-14T08:04:24+5:30
शेपटीवर लिहिलेय ‘वादळ येत आहे’; बंगळुरात आशियातील सर्वात मोठ्या एरोस्पेस प्रदर्शनाला सुरुवात
बंगळुरू : येथील येलाहंका हवाई दलाच्या संकुलात १४व्या ‘एरो इंडिया’ प्रदर्शनाला सोमवारी सुरुवात झाली. हा एअर शो पाच दिवस चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले. स्वदेशी सुपरसॉनिक विमान एचएलएफटीने या शोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या शेपटीवर हनुमानाचे छायाचित्र आहे. यासोबतच एक मेसेजही लिहिला आहे, वादळ येत आहे.
उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी हा फक्त एअर शो होता, पण आता तो भारताची ताकद म्हणून समोर येत आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच प्रेक्षकही या शोमध्ये सहभागी होत आहेत. मोदी म्हणाले की, संरक्षण उत्पादनातील गुंतवणुकीसाठी भारत हे एक आकर्षक ठिकाण म्हणून सादर करताना अनुकूल आर्थिक धोरणांमुळे देश जागतिक स्तरावर लष्करी उपकरणे निर्यात करणारा आघाडीचा देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
मोदी म्हणाले की, भारताने गेल्या आठ-नऊ वर्षांत संरक्षण उत्पादन क्षेत्राचे पुनरुज्जीवन केले आहे आणि ते २०१४ पर्यंत लष्करी उपकरणांची निर्यात १.५ दशलक्ष डॉलरवरून ५ दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्याचा विचार आहे.
मोदी म्हणाले...
२१व्या शतकातील नवा भारत कोणतीही संधी सोडणार नाही. दशकांपर्यंत सर्वात मोठा संरक्षण आयातदार असलेला देश जगातील ७५ देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. गेल्या पाच वर्षांत देशाच्या संरक्षण निर्यातीत सहापट वाढून निर्यातीत १.५ अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला. आज ‘एरो इंडिया’ हा केवळ शो नाही, तर ती भारताची ताकद आहे.
प्रदर्शनात दिग्गजांचा सहभाग
‘एरो इंडिया’मधील प्रमुख प्रदर्शकांमध्ये एअरबस, बोईंग, डसॉल्ट एव्हिएशन, लॉकहीड मार्टिन, इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री, ब्रह्मोस एरोस्पेस, आर्मी एव्हिएशन, एचसी रोबोटिक्स, एसएएबी, सफारान, रोल्स रॉयस, लार्सन अँड टुब्रो, भारत फोर्ज लिमिटेड यांचा समावेश आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आणि बीईएमएल लिमिटेडचीही स्टॉल आहेत.
चित्तथरारक प्रात्यक्षिके
nया कार्यक्रमात आयोजित केलेल्या एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाच्या अनेक विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या.
n‘एरो इंडिया’ची
थीम ‘द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’ आहे आणि संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रातील भारताची प्रगती आणि क्षमता प्रदर्शित करण्याचा उद्देश आहे.
७०० कंपन्या सहभागी
n पाच दिवस चालणारे हे प्रदर्शन आशियातील सर्वात मोठे मानले जाते.
n यामध्ये ७०० हून अधिक भारतीय आणि परदेशी संरक्षण कंपन्या आणि १०० देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यामध्ये अनेक देशांचे संरक्षण मंत्रीही सहभागी आहेत.