सेतू भारतम प्रकल्पाचे उद्घाटन : देशभरात होणार २०८ नवे पूल
By admin | Published: March 5, 2016 04:21 AM2016-03-05T04:21:51+5:302016-03-05T04:21:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महत्त्वाकांक्षी ‘सेतू भारतम्’ प्रकल्पाचे उद्घाटन केले. किमान ५० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून २०१९पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग
प्रमोद गवळी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महत्त्वाकांक्षी ‘सेतू भारतम्’ प्रकल्पाचे उद्घाटन केले. किमान ५० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून २०१९पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वेक्रॉसिंगपासून मुक्त केले जातील. या प्रकल्पांतर्गत एकूण २०८ मार्गांवरील पूल उभारले जाणार असून, महाराष्ट्रातील १२ पुलांचा त्यात समावेश आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर क्षेत्रातील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरीसह ६ मार्गांचा त्यात समावेश आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर रस्त्यांचा विकास अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची कोनशिला बसविल्याबद्दल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे आभार मानले. रेल्वेमार्गावर क्रॉसिंग पूल तसेच आवश्यकता असेल तेथे अंडरब्रीज उभारण्यासाठी ‘सेतू भारतम्’ योजना तयार करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये प्रकल्पाच्या निविदा जारी केल्या जातील.
विदर्भातील मार्ग
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागातील सावनेर- धापेवाडा- कळमेश्वर- गोंडखैरी, आंध्र प्रदेश सीमेवरील गडचिरोलीमध्ये कारंजी- वणी- चंद्रपूर- मूल-सावली, गडचिरोली जिल्ह्यातील साकोली- लाखांदूर, वडसा- गडचिरोली-चार्मोशी- आष्टी- सिरोंचा, नागपूर जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर-नागभीड, ब्रह्मपुरी-आरमोरी,अकोला- वाशिम.
महाराष्ट्रातील उर्वरित मार्ग....
सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधील रत्नागिरी-सांगोला- मंगळवेढा- सोलापूर, सोलापूर- अक्कलकोट- दुधनी-चौदापूर- गानगापूर- गुलबर्गा, हिंगोली- नांदेड- देगलूर, रत्नागिरी- सांगोला- मंगळवेढा- सोलापूर, सोलापूर- वीजापूर मार्ग
अन्य राज्यांमधील पूल असे आहेत
आंध्र प्रदेश ३३, आसाम १२, बिहार २०, छत्तीसगड ५, गुजरात ८, हरियाणा १०, हिमाचल प्रदेश ५, झारखंड ११, कर्नाटक १७, केरळ ४, मध्यप्रदेश ६, ओडिशा ४, पंजाब १०, राजस्थान ९, उत्तराखंड २, उत्तर प्रदेश ९ आणि प.बंगालमधील २२ पुलांचा या योजनेत समावेश आहे.