महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रला 'कलमेश्वर' पावणार; पाण्याची चिंता मिटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 06:51 PM2019-06-21T18:51:27+5:302019-06-21T20:29:58+5:30
तेलंगाना सरकारने गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचे निर्माण केले आहे.
हैदराबाद : गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प सर्वात कमी वेळात पूर्ण करण्यात आला. यामुळे तेलंगाना, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचा सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कलेश्वरम प्रकल्पाचे आज तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
तेलंगाना सरकारने गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचे निर्माण केले आहे. या प्रकल्पात 22 पंप हाऊस वापरण्यात आले आहेत. या द्वारे दिवसाला तीन टीएमसी पाणी खेचण्याची ताकद निर्माण होणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मेदिगड्डा, अन्नाराम, सुंडिला पंप हाऊस पाणी उचलण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात जगातील सर्वात मोठे भूमिगत पंपहाऊस आहे. जे दिवसाला दोन टीएमसी पाणी खेचण्याची क्षमता ठेवते. आज आंध्र प्रदेशचे राज्यपाल नरसिंहम गुरु, तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगनमोहन रेड्डी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
फडणवीस यांनी सांगितले की, कलेश्वरम प्रकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेने तेलंगानाला दिलेली भेट आहे. तेलंगाना सरकारने कमी वेळात हा प्रकल्प पूर्ण केला. ही योजना त्यांच्यासाठी एक यश आहे.
केवळ 24 महिन्यांत प्रकल्प पूर्ण
जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचा मान मिळालेल्या कलेश्वरम प्रकल्पाला केवळ 24 महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेतून गोदावरी नदीचे पाणी आधीच मेदिगड्डा पंप हाऊसपर्यंत पोहोचविण्यात आले होते. पंपांचा स्वीच ऑन केल्यास हे पाणी पुन्हा गोदावरी नदीमध्ये पोहचते. जे भूमिगत पाईपमधून वरच्या भागात असलेल्या अन्नाराम बराजपर्यंत पोहोचते. तीन टीएमसी पाण्यासाठी 7152 मेगावॅट वीजेची गरज लागणार आहे.