काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:42 PM2024-10-25T16:42:29+5:302024-10-25T16:50:19+5:30
भिकाऱ्यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे.
लखनौमध्ये अनेक भिकाऱ्यांकडे स्मार्टफोन आणि पॅनकार्ड सापडले आहेत. भिकाऱ्यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे. सर्वेक्षणादरम्यान लखौमध्ये ५३१२ भिकारी आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये भिकाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासंदर्भात समाज कल्याण विभाग आणि DUDA (जिल्हा नागरी विकास संस्था) यांनी एक सर्वेक्षण केलं. ज्यामध्ये ५३१२ भिकारी आढळले ज्यांची कमाई कष्टकरी लोकांपेक्षा जास्त आहे. लहान मुलांना कडेवर घेऊन भीक मागणाऱ्या महिलांची रोजची कमाई प्रत्येकी ३,००० रुपयांपर्यंत आहे. वृद्ध आणि लहान मुले ९०० रुपयांपासून ते २ हजार रुपये कमावत आहेत.
सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलं की, ते अनेक दिवसांपासून परिसराचं सर्वेक्षण करत आहेत. काही लोक मुद्दाम भीक मागत आहेत. ९० टक्के भिकारी आहेत, जे हरदोई, बाराबंकी, सीतापूर, उन्नाव, रायबरेली इत्यादी जिल्ह्यांमधून आले आहेत. या भिकाऱ्यांचं उत्पन्न समजल्यावर अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. त्यांनी सांगितलं की, बाराबंकीच्या लखपेडाबाग येथे राहणारा भिकारी अमन याच्याकडे स्मार्टफोनपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही आहे. त्याच पॅनकार्डही आहे.
सर्वेक्षणानुसार, लखनौचे लोक दररोज सरासरी ६३ लाख रुपये भिकाऱ्यांना देतात. लखनौ महानगरपालिका, समाजकल्याण विभाग आणि DUDA यांच्या सर्वेक्षणात राजधानी लखनौमध्ये एकूण ५३१२ भिकारी आढळले आहेत. या भिकाऱ्यांच्या उत्पन्नाबाबत सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, ते दररोज सरासरी ३,००० रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. ही कमाई करण्यात स्त्रिया पुढे आहेत.