शेती उत्पन्नावर आयकर लावण्याचा विचार नाही - जेटली
By admin | Published: April 27, 2017 01:18 AM2017-04-27T01:18:23+5:302017-04-27T01:18:23+5:30
शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.
नवी दिल्ली : शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.
निती आयोगाचे सदस्य विवेक देवरॉय यांनी शेतीतील उत्पन्नावर कर लावण्याची सूचना काल केली होती. कराचा आधार वाढविण्यासाठी विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त शेती उत्पन्नावर कर लावण्यात यावा, असे त्यांनी म्हटले होते. यावर वित्तमंत्र्यांनी तातडीने टिष्ट्वट करून खुलासा केला आहे. जेटली म्हणाले की, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शेती उत्पन्नावर कोणत्याही प्रकारे कर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. घटनेने राज्य आणि केंद्र सरकारमध्ये केलेल्या अधिकारांच्या वाटणीनुसार शेती उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकारच केंद्र सरकारला नाही.
शेतीतील उत्पन्न हा अत्यंत संवेदनशील विषय असून, त्यावर कर लावण्याचे आजपर्यंत सर्वच सरकारांनी टाळले आहे. २२ मार्च रोजी जेटली यांनी संसदेत यासंबंधीचा स्पष्ट खुलासा करून शेती उत्पन्नावर कर लावला जाणार नसल्याचे नमूद केले होते.
वक्तव्यापासून दूर
शेती उत्पन्नावर कर लावण्याच्या बिबेक देबरॉय यांच्या सूचनेपासून निती आयोगाने स्वत:ला दूर केले आहे. देबरॉय हे निती आयोगाचे सदस्य आहेत, त्यामुळे आयोगाचीच ही भूमिका नाही ना, असा संभ्रम निर्माण झाला होता. तो आयोगाने दूर केला आहे. देबरॉय यांनी व्यक्त केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असा खुलासा निती आयोगाने एक निवेदन जारी करून केला आहे
निती आयोगाच्या तीन वर्षांच्या कृती आराखड्यात शेती उत्पन्नावर कर लावण्याची तरतूद असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. याचाही आयोगाने इन्कार केला आहे. आयोगाने म्हटले की, शेती उत्पन्नावर कर लावण्यात यावा अशी कोणतीही शिफारस आयोगाने केलेली नाही.