'भल्लालदेव'च्या वडिलांच्या घरावर, स्टुडीओवर आयकर विभागाचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 08:19 AM2019-11-21T08:19:59+5:302019-11-21T08:20:22+5:30
दग्गुबाती सुरेश बाबू यांचा हैदराबादमध्ये रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते टॉलिवूडचे निर्मातेही आहेत.
नवी दिल्ली : बाहुबली या सुपरडुपर हिट झालेल्या चित्रपटातील भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू यांच्या घर आणि स्टुडिओसह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. बुधवारी सकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली.
दग्गुबाती सुरेश बाबू यांचा हैदराबादमध्ये रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते टॉलिवूडचे निर्मातेही आहेत. आयकर विभागाने हैदराबादच्या त्यांच्या निवासस्थानीही छापा मारल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रेही तपासली आहेत. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. निर्माते दग्गुबाती सुरेश बाबू यांच्याकडून अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
सुरेश बाबू हे टॉलिवूडचे मोठे निर्माते म्हणून ओळखले जातात. ते निर्माते दग्गुबाती रामानायडू यांचे पूत्र आहेत. त्यांनी सुरेश प्रॉडक्शनची सुरूवात केली होती. आतापर्यंत 150 सिनेमांची निर्मिती केली आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये काही थिएटरही आहेत.
आयकर विभागाचा छापा पडला तेव्हा सुरेश बाबू देशात नसल्याचे समजते. आयकर विभागाच्या रडारवर अन्य निर्मात्यांचे प्रॉडक्शन हाऊसही आहेत. यामध्ये नॅचरल स्टार नानी, हरिका हसाईन क्रिएशन्स, सितारा एंटरटेन्मेंट यांची नावे आहेत.