चिनी मोबाईल कंपन्यांवर ITची मोठी कारवाई, दिल्ली-मुंबईसह अनेक ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 01:08 PM2021-12-22T13:08:57+5:302021-12-22T14:33:50+5:30
मोबाईल कंपनी Oppo Group आणि Xiaomi विरोधात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरुसह अनेक शहरांमधील या कंपन्यांच्या कार्यालयांची झडती सुरू आहे.
नवी दिल्ली: भारतात काम करणाऱ्या चायनीज मोबाईल कंपन्यांवर इनकम टॅक्स विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील चायनीज मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर बुधवारी सकाळपासून ही छापेमारी सुरू आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरुसह अनेक शहरांमधील या कंपन्यांच्या कार्यालयांची झडती सुरू आहे.
मोबाईल क्षेत्रात चिनी कंपन्यांचा सर्वाधिक वाटा
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल कंपनी Oppo Group आणि Xiaomi विरोधात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ओप्पो ग्रुपशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी, संचालक, सीएफओ आणि इतर अधिकाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. एका अहवालानुसार, भारतात स्मार्टफोनची बाजारपेठ सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची आहे. यामध्ये 70 टक्के हिस्सा चिनी कंपन्यांच्या उत्पादनांचा आहे. भारतातील टेलिव्हिजन मार्केट सुमारे 30,000 कोटी रुपयांचे आहे. यामध्ये चिनी कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीचा वाटा सुमारे 45 टक्के आहे. नॉन-स्मार्ट टीव्हीचा वाटा सुमारे 10 टक्के आहे.
कुठे सुरू आहे छापेमारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची ही छापेमारी दिल्ली-एनसीआरच्या गुरूग्राम, रेवाडीमध्ये होत आहेत. दिल्ली युनिट आणि बंगळुरू युनिटकडून छापे टाकले जात आहेत. सध्या 80 चिनी कंपन्या देशात सक्रियपणे व्यवसाय करत आहेत. भारतात एकूण 92 चीनी कंपन्या नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 80 कंपन्या 'सक्रियपणे' व्यवसाय करत आहेत.
नेपाळ आणि अमेरिकेतही कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या विमानतळ पायाभूत सुविधा विकास प्रकल्पात सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आली आहे. चायना सीएमसी इंजिनीअरिंग कंपनी, नॉर्थवेस्ट सिव्हिल एव्हिएशन एअरपोर्ट कन्स्ट्रक्शन ग्रुप आणि चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या तीन वेगवेगळ्या चीन समर्थित कंपन्यांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. याशिवाय नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने सुमारे 13 चिनी कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. या कंपन्यांना अमेरिकन व्यवसाय करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.