प्राप्तिकर विभागाच्या तामिळनाडूत धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 04:57 AM2019-04-13T04:57:02+5:302019-04-13T04:57:54+5:30
निवडणुकीत बेहिशेबी पैसा : बेकायदा रकमेवर वॉच
चेन्नई : मतदारांना आमिषे दाखविण्यासाठी वापरण्यात येणारी कथित बेकायदेशीर रक्कम हुडकून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी तामिळनाडूतील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ही कारवाई सुरूच होती.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई, नमक्कल आणि तिरुनेलवेली या शहरांतील १८ ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सकाळीच या ठिकाणी धडकले होते. दोन पातळ्यांवर या धाडी टाकल्या जात आहेत. पहिल्या पातळीवर पीएसके इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठिकाणांवर चौकशी केली जात आहे. बेहिशेबी रोख रक्कम बाळगणे आणि ती अन्यत्र वळविणे या कामात कंपनीचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
चेन्नईतील तीन ठिकाणी आणि नमक्कलमधील चार ठिकाणी कंपनीच्या कार्यालयांची चौकशी केली जात आहे. दुसऱ्या पातळीवर चेन्नईतील कॅश हँडलर्स आणि फायनान्सर्स यांची तपासणी प्राप्तिकर विभागाची तपास शाखा करीत आहे. निवडणुकीत वापरता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हे लोक गोळा करीत असल्याची माहिती असून, त्यानुसार ही चौकशी केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
तामिळनाडूतील ३९ जागा आणि एकमेव जागा असलेल्या पुदुच्चेरीत १८ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होत आहे. (वृत्तसंस्था)
चेन्नईत दहा ठिकाणी तपासणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडींचे लक्ष्य ठरलेल्या दोन लोकांची प्राथमिक माहिती बाहेर आली आहे. आकाश भास्करन आणि सुजय रेड्डी अशी त्यांची नावे आहेत. कॅश हँडलर्सच्या प्रकरणात चेन्नईत १० ठिकाणी, तर तिरुनेलवेलीत एका ठिकाणी तपासणी केली जात आहे.