परदेशातील काळा पैसा रडारवर; आयकर विभागाकडून अनेकांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 09:03 AM2018-10-23T09:03:16+5:302018-10-23T09:10:17+5:30
दोषी आढळल्यास 10 वर्षे तुरुंगवास घडणार
नवी दिल्ली: परदेशातील काळ्या पैशांविरोधात आयकर विभागानं कारवाई सुरू केली आहे. भारतीयांच्या परदेशातील मालमत्ता आणि संपत्तीची माहिती गोळा करण्यासाठी विभागानं अनेकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणांमध्ये काही काळंबेरं आढळल्यास काळ्या पैशाविरोधात तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
परदेशात मालमत्ता खरेदी केलेल्या, मात्र त्यांची माहिती सरकारला न देणाऱ्यांची यादी आयकर विभागाकडून तयार करण्यात येत आहे. यातील काहींची ओळख पटली असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. मोदी सरकारनं 2015 मध्ये काळ्या पैशाविरोधातील एका नव्या कायद्याला मंजुरी दिली होती. या कायद्याच्या अंतर्गत परदेशातील अवैध संपत्ती, पैसा आणि मालमत्तेविरोधात कारवाई केली जाऊ शकते. या कायद्याच्या अंतर्गत दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास घडू शकतो.
काळ्या पैशाचा मुद्दा निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या झंझावाती प्रचारात अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला होता. परदेशातील काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन मोदींनी सव्वासो करोड देशवासीयांना दिलं होतं. मात्र अद्याप तरी हे आश्वासन पूर्णत्वास गेलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी वारंवार या मुद्यावरुन सरकारवर टीका केली. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा सरकारसाठी अडचणीचा ठरु शकतो. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं परदेशातील काळ्या पैशाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.