मऊपासून मैनपूरीपर्यंत, अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:11 AM2021-12-18T11:11:25+5:302021-12-18T11:12:01+5:30
Income Tax Raid on Samajwadi Party Leaders Property : समाजवादी पक्षाचे प्रमुख Akhilesh Yadav यांचे निकटवर्तीय मनोज यादव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. त्याशिवाय प्राप्तिकर विभागाने सपाचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते राजीव राय, जैनेंद्र यादव यांच्यासह अनेक जणांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
लखनौ - समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मनोज यादव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. त्याशिवाय प्राप्तिकर विभागाने सपाचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते राजीव राय, जैनेंद्र यादव यांच्यासह अनेक जणांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. राय यांनी आरोप केला की, ही कारवाई राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन करण्यात आली आहे. यादव हे प्रसिद्ध कंपनी आरसीएल ग्रुपचे मालक आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असून, तेथे सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या सपा यांच्यात मुख्य लढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.
प्राप्तिकर विभागाने आज सकाळी लखनौ, मैनपुरी, आग्रा येथे सपाचे निकटवर्तिय असलेल्या व्यक्तींच्या घरी धाडी टाकल्या. लखनौमधील आंबेडकर पार्क येथील जैनेंद्र यादव यांच्या निवासस्थानावर धाड पडली आहे. तसेच मऊमधील राजीव राय यांच्या निवास्थानावरही प्राप्तिकर विभागाचा छापा पडला आहे. राय यांनी सांगितले की, प्राप्तिकर विभागाचे लोक आमच्या प्रत्येक ठिकाणावर छापा टाकत आहेत. अगदी आमच्या बंगळुरूमधील घरावही धाड टाकण्यात आली आहे. ही कारवाई राजकीय द्वेषभावनेतून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आम्ही समाजवादी लोक अशा कारवाईला घाबरणार नाही, असे आव्हानही दिले.
प्राप्तिकर विभागाचे अधिकारी मनोज यादव यांच्या ठिकाणांवर संपूर्ण तयारीसह पोहोचले होते. या अधिकाऱ्यांसोबत १२ गाड्यांचा ताफा होता. त्यांच्या संपूर्ण घराला सुरक्षा दलांनी वेढा दिला. तसेच घरातील सदस्यांची चौकशी सुरू आहे. तसेच समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राय यांच्या मालमत्तांवरही सुरक्षा दलांनी पहारा दिला आहे. तसेच येथे सकाळी पोहोचलेले अधिकारी चौकशी करत आहेत.