‘नोटाबंदी’नंतर सायबर हल्ल्यांत वाढ
By admin | Published: January 25, 2017 12:49 AM2017-01-25T00:49:48+5:302017-01-25T00:49:48+5:30
‘नोटाबंदी’ लागू झाल्यानंतर मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर चोरांनी त्यांचा मोर्चा स्मार्टफोन आणि विशेषत: अॅण्ड्रॉइड फोनकडे वळविला आहे.
मुंबई : ‘नोटाबंदी’ लागू झाल्यानंतर मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर चोरांनी त्यांचा मोर्चा स्मार्टफोन आणि विशेषत: अॅण्ड्रॉइड फोनकडे वळविला आहे. परिणामत: गेल्या दोन महिन्यांपासून अॅण्ड्रॉइड फोनवरील सायबर हल्ल्यांत मोठी वाढ झाल्याचे ‘एफ-सिक्युअर’ या आघाडीच्या युरोपीय सायबर सुरक्षा कंपनीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कंपनीने ‘थ्रेट लँडस्केप इंडिया २०१६ अॅण्ड बियॉण्ड’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. नोटाबंदीनंतर २०१७मध्ये भारतातील पॉइंट आॅफ सेल (पीओएस) आणि बँकिंग मालवेअर्स विशेषत: मोबाइल वॉलेट्सना मोठा धोका असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात संगणकापेक्षा मोबाइलवरून इंटरनेटचा अधिक वापर करण्यात येतो. त्यातही नोटाबंदीनंतर मोबाइल वॉलेट्स वापरामध्ये मोठी वाढ झाली असून, त्यात ‘टेल्को बॅक्ड वॉलेट्स, स्वतंत्र वॉलेट्स, बँकेचा पाठिंबा असलेल्या वॉलेट्स’चा अधिक वापर होत आहे.
प्रत्येक विक्रेत्याकडे वेगवेगळी वॉलेट्स वापरली जात असल्यामुळे लोक मोबाइलमध्ये विविध वॉलेट अॅप्स ठेवत आहेत. त्यामुळे सायबर हल्ल्याच्या धोक्यांमध्येही वाढ झाली आहे, असेही अहवालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)