‘आधार’ कार्डला पॅन कार्डशी जोडण्याची मुदत वाढवली, आता 31 डिसेंबरपर्यंत करू शकता लिंक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 09:29 PM2017-09-27T21:29:12+5:302017-09-27T21:29:23+5:30
आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. तुम्ही आता 31 डिसेंबर 2017पर्यंत आधारला पॅन कार्डशी जोडू शकता. केंद्र सरकारनं याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. तुम्ही आता 31 डिसेंबर 2017पर्यंत आधारला पॅन कार्डशी जोडू शकता. केंद्र सरकारनं याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. तसेच केंद्रानं बँकांच्या सर्व ग्राहकांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत आपली खाती ‘आधार कार्ड’शी जोडणे अनिवार्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील बँकांनाही आता आपल्या ग्राहकांसाठी ‘आधार कार्ड‘ नोंदणी आणि ‘आधार’च्या तपशीलात बदल करण्याची सेवा द्यावी लागणार आहे. 31 डिसेंबर 2017पर्यंत जे बँकांचे ग्राहक आपले बँक खाते आधार कार्डशी जोडत नाहीत, त्यांची खाती या तारखेनंतर गोठवण्यात येणार आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने 1 जुलै रोजी सर्व बँक खाती ‘आधार’शी जोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशात ‘प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग’चाही (पीएमएलए) समावेश केला होता. सद्यस्थितीत बहुतांश बँका आधार कार्ड आणि खाते जोडण्याची सेवा देत आहेत.
मात्र, अजूनही बऱ्याच जणांकडे आधार कार्ड नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड काढणं गरजेचं करण्यात आलं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यापासून मोबाईल फोन कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्र सरकारनं मोबाईल फोनच्या सिम कार्डला आधारशी लिंक करण्याची मुदत फेब्रुवारी 2018पर्यंत वाढवली आहे. तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला नाही, तर तो नंबर बंद होणार आहे.
आधार कार्डसाठी 31 डिसेंबर 2017पर्यंत करू शकता अर्ज
सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’ कार्ड काढण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने आता येत्या 31 डिसेंबर 2017पर्यंत वाढविली आहे. आधी ही मुदत 30 सप्टेंबर होती. ज्यांनी अजूनही ‘आधार’साठी अर्ज केलेला नाही त्यांना या वाढीव मुदतीत अर्ज करता येतील. एकूण 135 सरकारी योजनांसाठी ‘आधार’ सक्तीचे करण्यात आले आहे.