दानिश अली प्रकरणात रमेश बिधूडींच्या अडचणीत वाढ! लोकसभेची समिती करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 06:09 PM2023-09-28T18:09:17+5:302023-09-28T18:10:40+5:30
बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या प्रकरणाची आता लोकसभेची समिती चौकशी करणार आहे.
बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या प्रकरणाची आता लोकसभेची समिती चौकशी करणार आहे. त्यामुळे भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ट्विट करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी दानिश अली यांच्याशी संबंधित प्रकरणाचा तपास लोकसभा सचिवालयाच्या समितीकडे सोपवण्यात आल्याचे म्हटले आहे.
भाजपचे लोकसभेत बहुमत असल्यानेच हे शक्य झाल्याचे निशिकांत दुबे म्हणाले. यापूर्वीही अशी प्रकरणे सभागृहात अनेकदा आली होती, मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, लोकसभेत २००६ मध्ये आरजेडी-जेडीयू-काँग्रेसमध्ये वाद झाला होता. २०१२ मध्ये सोनिया गांधी संदर्भात असंच घडलं होतं त्यावेळी ना समिती बनवली ना शिक्षा झाली.
रमेश बिधूडी यांची राजस्थानच्या टोंक जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या अपरुपा पोद्दार, द्रमुकच्या खासदार कनिमोझी आणि इतर अनेक विरोधी सदस्यांनी बिधूडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना पत्र लिहून केली होती. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची विनंतीही या खासदारांनी केली होती.
२१ सप्टेंबर रोजी लोकसभेत 'चंद्रयान-३ यश आणि अंतराळ क्षेत्रातील भारताचे यश' या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान बिधूडी यांनी अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते. दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे आणि रवी किशन यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा दावा केला होता.