भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ; प्रशासनाची चिंता वाढवणारी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:24 PM2022-07-18T13:24:54+5:302022-07-18T13:26:31+5:30
सध्या देशात १.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोना संक्रमणाचा वेग अचानक वाढला कसा? आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील ७ आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकडेवारी होणारी वाढ चिंताजनक आहे. एका आठवड्यात सव्वा लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३०० हून जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाबत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बूस्टर डोस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत कोरोनाचे १६ हजार ९३५ रुग्ण समोर आले आहेत. तर ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे १६१ दिवसानंतर पुन्हा कोरोना संक्रमितांचा दर ६ टक्क्याहून अधिक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमाण मानलं तर ज्याठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्याहून अधिक असेल तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहता प्रशासन सतर्क झाले आहे.
सध्या देशात १.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोना संक्रमणाचा वेग अचानक वाढला कसा? आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडा ३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ११ ते १७ जुलै या काळात १ लाख २८ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४ ते ११ जुलै कालावधीत १.२० लाख रुग्ण आढळले आणि २३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
२७ राज्यांत ८ तासांत वाढले रुग्ण
देशातील २७ राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येते. त्यात दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगालसारख्या राज्यांचा समावेश आहे. तर ८ राज्य अशीही आहेत ज्याठिकाणी रुग्णसंख्येत घट झाल्याचं सकारात्मक चित्र आहे. २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये २ हजार ६५९, केरळ २६०४, तामिळनाडू २३१६, महाराष्ट्र २१८६ आणि कर्नाटकात ९४४ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत ४९८ तर यूपीत ३५९ रुग्ण सापडले आहेत.
संक्रमण वाढण्याचं कारण काय?
कोरोना संक्रमण वाढण्यामागे ओमायक्रॉन आणि सब व्हेरिएंट कारणीभूत आहे. देशात ओमायक्रॉन सब व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात ८० ते ८५ टक्के रुग्ण BA.2, BA2.38 व्हेरिएंटचे आहेत. परंतु सब व्हेरिएंट जास्त गंभीर नाही, त्यामुळे लोकांनी जास्त घाबरू नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.