पंतप्रधान मोदींचं उत्पन्न वाढता वाढता वाढे; जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:45 PM2019-04-26T16:45:18+5:302019-04-26T16:45:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लखनौ - पंतप्रधाननरेंद्र मोदींनीवाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये, मोदींच्या एकूण संपत्तीचे विवरण करण्यात आले आहे. मोदींकडे एकूण 2.5 कोटी रुपयांची संपत्ती असून राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमध्ये असलेल्या ठेवीवरील व्याजातूनच मोदींना पैसा मिळतो. या व्यतिरिक्त मोदींना उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नाही.
पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाराणसीचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी अन्नपूर्णा शुक्ला यांचे चरण स्पर्श केले. अन्नपूर्णा देवींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला. मोदींनी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीचे विवरण करण्यात आले आहे. मोदींच्या नावावर एक घर असून एकही गाडी त्यांच्याकडे नाही. तसेच, मोदींच्या नावावर जमिनीचा एक तुकडाही नाही, म्हणजे मोदींना शेती नाही.
मोदींचे उत्पन्न गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यंदा दुप्पट झाल्याचे दिसून येते. मोदींचे सन 2013-14 साली उत्पन्न 9 लाख 69 हजार 711 रुपये होते. तर, 2018-19 या वर्षभरातील उत्पन्न 19 लाख 92 हजार 520 रुपये एवढे आहे. सन 2014 पासून मोदींच्या संपत्तीत दरवर्षी वाढ झाली आहे. पण, 2016-17 मध्ये मोदींच्या संपत्तीत 2015-16 पेक्षा घट झाल्याचे दिसून येते. जवळपास 4 लाख 70 हजार रुपयांची ही घट दिसत आहे. त्यानंतर, 2018-19 मध्ये मोदींचे वार्षिक उत्पन्न जवळपास 20 लाख रुपये आहे.
2013-14 : 9 लाख 69 हजार 711 रुपये
2014-15 : 8 लाख 58 हजार 780 रुपये
2015-16 : 19 लाख 23 हजार 160 रुपये
2016-17 : 14 लाख 59 हजार 750 रुपये
2017-18 : 19 लाख 92 हजार 520 रुपये
मोदींनी प्रतिज्ञापत्रात पत्नी जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांचा पॅन कार्ड नंबर आणि उत्पन्नाबाबत ‘माहित नाही’ असा उल्लेख आहे. तसेच, पत्नीच्या शिक्षण, व्यवसाय, संपत्ती इत्यादीबाबतही ‘माहित नाही’ असाच उल्लेख शपथपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी वाराणसीमध्ये भव्य रोडशो केला. या रोड शोला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर, मोदींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
जंगम मालमत्तेचं विवरण :
रोख रक्कम – 38 हजार 750 रुपये
बँकेतील ठेवी – 1 कोटी 27 लाख 85 हजार 717 रुपये
गुंतवणूक – 20 हजार रुपये (एल अँड टीचे बाँड)
गुंतवणूक –7 लाख 61 हजार 466 रुपये (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट)
गुंतवणूक –1 लाख 90 हजार 347 रुपये (एलआयसी)
दागिने – 45 ग्रॅमच्या सोन्याच्या 4 अंगठ्या (किंमत – 1 लाख 13 हजार 800 रुपये)
इतर – 85 हजार 145 रुपये (टीडीएस) आणि 1 लाख 40 हजार 895 रुपये (पीएमओ)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिक्षण
एसएससी (1967) – एसएससी बोर्ड, गुजरात
बीए (1978) – दिल्ली यूनिव्हर्सिटी, दिल्ली
एमए (1983) – गुजरात यूनिव्हर्सिटी, अहमदाबाद