दूरध्वनीचा वापर करणाऱ्यांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:20 AM2020-01-02T03:20:38+5:302020-01-02T03:21:41+5:30
ग्रामीण भागात ५.८७, तर शहरात ३.७४ दशलक्ष ग्राहक वाढले
मुंबई : भारतीय दूरध्वनी ग्राहकांमध्ये सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबर २०१९ या महिन्यात ९६ लाख १ हजारांनी वाढ झाली आहे. शहरी भागातील ग्राहकांपेक्षा ग्रामीण भागातील ग्राहक अधिक वाढले आहेत. यामध्ये शहरी ग्राहकांच्या संख्येत ३७ लाख ४ हजार, तर ग्रामीण भागातील ग्राहकांच्या संख्येत ५८ लाख ७ हजारांची वाढ झाली आहे.
भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय)ने प्रकाशित केलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात ३१ आॅक्टोबरअखेरीस १२० कोटी ४८ लाख दूरध्वनी ग्राहक आहेत. त्यापैकी मोबाइलधारकांची संख्या ११८ कोटी ३४ लाख, तर लँडलाइनधारकांची संख्या २ कोटी १४ लाख आहे. ब्रॉडब्रँडधारकांची संख्या ६४ कोटी ४ लाख असून, त्यामध्ये वायरलेसधारकांची संख्या ६२ कोटी ५० लाख, तर वायरलाइनधारकांची संख्या १ कोटी ९० लाख आहे.
मोबाइल पोर्टेबिलिटीसाठी ४.०८ दशलक्ष अर्ज
आॅक्टोबरमध्ये देशात ४० लाख ८ हजार जणांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)साठी अर्ज केले होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत एमएनपीसाठी केलेल्या अर्जांची संख्या ४५ कोटी ७६ लाख होती. त्यामध्ये वाढ होऊन आॅक्टोबरअखेर ती ४६ कोटी १७ लाख एवढी झाली. एमएनपी प्रक्रिया सुरू झाल्यापासून सर्वात जास्त अर्ज कर्नाटकमधून ४ कोटी २२ लाख जणांनी केले. मुंबईतून २ कोटी ३२ लाख, तर महाराष्ट्रातून ३ कोटी ४३ लाख जणांनी यासाठी अर्ज केले आहेत.