हिंदूंनो लोकसंख्येत वाढ करा- गिरीराज सिंह
By admin | Published: October 24, 2016 04:59 PM2016-10-24T16:59:25+5:302016-10-24T17:00:50+5:30
गिरीराज सिंग यांनी हिंदू समाजानं लोकसंख्येत वाढ करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - वादग्रस्त वक्तव्ये करण्याची खोड जडलेले नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी हिंदू समाजानं लोकसंख्येत वाढ करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याचा विचार केला पाहिजे. देशात हिंदूंनी लोकसंख्या वाढवण्याची नितांत गरज आहे. देशातील 8 राज्यांत हिंदूंची संख्या दिवसेंदिवस सातत्यानं कमी होताना दिसत आहे, असं गिरिराज सिंह यांनी सांगितलं. सहारणपूर जिल्ह्यामधील देवबंद भागामधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सिंह यांनी मत मांडलं आहे.
गिरिराज सिंह यांनी मोहन भागवत यांनीही हिंदूंनी लोकसंख्या वाढवली पाहिजे, असं केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. हिंदूंना जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कायद्यातही तशी तरतूद नाही, असंही ऑगस्टमध्ये मोहन भागवत बोलल्याचं गिरिराज सिंग यांनी आवर्जून सांगितलं आहे. "देशातील जनता राम मंदिराची मागणी करत आहे; मात्र देशात रामभक्तच शिल्लक राहिले नाहीत, तर राम मंदिराची स्थापना शक्य होईल काय", अशी विचारणा सिंह यांनी यावेळी केली. "भारताची फाळणी झाल्यानंतर निर्माण झालेल्या पाकिस्तानमध्ये त्यावेळी हिंदूची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 22 % होती. मात्र आता ती 1 टक्क्यावर आली आहे. तसेच फाळणी झाल्यानंतर भारताच्या लोकसंख्येमधील हिंदूंचे प्रमाण 90% होते; तर मुस्लिमांचे प्रमाण 10% इतके होते. आता हिंदूंची लोकसंख्या 76% झाली आहे; तर मुस्लिमांची लोकसंख्या 24 % झाली आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली आहे.
(गिरीराज सिंगांना दुर्लक्षित करून सोनियांनी झटकले)
देशातील आठ राज्यांमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या सतत घसरत असून या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने त्यांची लोकसंख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सिंह म्हणाले. केंद्रीय मंत्री असलेल्या सिंह यांच्या या भूमिकेवर उत्तर प्रदेश राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीव्र पडसाद उमटू शकतात. याआधीही गिरिराज सिंग यांनी सोनिया गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "राजीव गांधी यांनी जर नायजेरियन मुलीशी लग्न केले असते आणि सोनिया गांधी जर गौरवर्णीय नसत्या तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते काय", अशी मुक्ताफळे उधळली होती.