यात्रेच्या मार्गातील सुरक्षा वाढवा

By admin | Published: July 12, 2017 12:12 AM2017-07-12T00:12:42+5:302017-07-12T00:15:18+5:30

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.

Increase the safety of the yatra route | यात्रेच्या मार्गातील सुरक्षा वाढवा

यात्रेच्या मार्गातील सुरक्षा वाढवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. या भागातील सुरक्षा वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. यात्रेकरूंवर सोमवारी झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यात सहा महिलांचा समावेश आहे. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग हे परिस्थितीचा आढाव घेण्यासाठी काश्मीरला गेले असून, लष्करप्रमुख बिपीन रावत हेही तिथे रवाना झाले आहे.
गृह मंत्रालयातील बैठकीत काश्मीरची परिस्थिती आणि अमरनाथकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर संस्था आणि निमलष्करी दलाचे अधिकारी उपस्थित होते. अमरनाथ यात्रेकरुंची सुरक्षा आणि भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी उपाय करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही यात्रा ७ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. या बैठकीनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पंतप्रधान मोदी यांना बैठकीतील चर्चेची माहिती दिली. अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी जी पाऊले उचलण्यात आली आहेत त्याची माहितीही देण्यात आली.
सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. यात्रा मार्गाच्या सुरक्षेसाठी राज्य पोलीस दलाशिवाय निमलष्करी दलाचे २१ हजार जवान तैनात करण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९५०० अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. अमरनाथ मार्गावरील वाहनांना पूर्ण सुरक्षा असते. पण, ज्या बसवर हल्ला झाला ती बस या वाहनांपैकी नव्हती. हल्ला झाला त्यावेळी बस श्रीनगरहून जम्मूला जात होती.
>मान शरमेने झुकली आहे
अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करतानाच, यामुळे काश्मिरींची मान शरमेने झुकली आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस केली. त्या म्हणाल्या की, ही घटना मुस्लीम आणि काश्मिरींसाठी एक डाग आहे. यामुळे काश्मीरची मूल्ये आणि संस्कृती यांना जबर धक्का बसला आहे. त्यांनी घटनास्थळीही भेट दिली आणि दोषींवर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे सांगितले.
>सुरक्षेतील त्रुटींबाबत आत्मपरीक्षण करा
देशातील सर्व १८ पक्षांनी दहशतवादी हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्यातील मृतांविषयी त्यांनी दु:खही व्यक्त केले आहे. ते करतानाच, गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या सूचनेनंतरही भयंकर हल्ला होतो, याबाबत सरकारने सुरक्षेच्या त्रुटीबाबत आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही सरकारला दिला आहे. भारताची बहुलता आणि विविधता यांच्यावरील हा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे हल्ले आपण का रोखू शकत नाही, याचे सरकारने आत्मपरीक्षण करावे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्टिट केले आहे की, सुरक्षेतील या त्रुटी गंभीर आणि अस्वीकार्य आहेत. पंतप्रधानांनी याची जबाबदारी स्वीकारावी. अशा भ्याड हल्ल्यांना भारत कधीही घाबरणार नाही.
>आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध
अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरुन निषेध होत आहे. अमेरिकेसह जर्मनी, नेपाळ आदी देशांनी याचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या राजदूतांनी आणि जर्मनचे राजदूत मार्टिन नी यांनी म्हटले आहे की, या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.
>२२ हजार यात्रेकरू रवाना
संकटांना न जुमानता २२,६३३ भाविक मंगळवारी अमरनाथकडे रवाना झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत या यात्रेकरूंना रवाना केले आहे. सीआरपीएफ आणि पोलिसांच्या सुरक्षेत २,२८३ पुरुष, ७५६ महिला आणि २५० साधू व साध्वी यांच्यासह ३२८९ भाविक ६८ वाहनांमध्ये आज अमरनाथकडे रवाना झाले. अमरनाथ देवस्थान मंडळाने सांगितले की, यात्रा सुरू झाल्यापासून यंदा १,४६,६९२ भाविकांनी अमरनाथाचे दर्शन घेतले आहे.
>मृतदेह व जखमींना सुरतला आणले
सुरत : काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील सात जणांचे मृतदेह तसेच १९ जखमी व इतर ३२ यात्रेकरूंसह बस ड्रायव्हर सलिम शेख या सर्वांना मंगळवारी विशेष विमानाने सुरत येथे आणण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे स्वत: तिथे हजर होते.
विमानतळांवर मृतांच्या तसेच जखमींच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी गर्दी केली होती. वातावरण शोकाकुल झाले होते. मृतांना व जखमींना आधी तेथील रुग्णालयात नेण्यात आले. काही जखमींवर तिथे उपचार सुरू राहणार आहेत. या सर्व उपचारांचा खर्च राज्य सरकार उचलेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दोन मृत महिला व आठ जखमी महाराष्ट्रातील असले, तरी ते सारे मूळ गुजरातचे आहेत. आपल्या गुजरातमधील नातेवाईकांसोबत त्यांनी अमरनाथ यात्रा व वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायचे ठरविले होते. 

गुजरातमध्ये हाय अ‍ॅलर्ट
या हल्ल्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गुजरातमधील सर्व सरकारी कार्यक्रम तसेच भाजपची आज होणारी बैठक रद्द करण्यात आली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपला गुजरात दौराच पुढे ढकलला.

Web Title: Increase the safety of the yatra route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.