धमकीनंतर कन्हैयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
By admin | Published: April 16, 2016 03:21 AM2016-04-16T03:21:04+5:302016-04-16T03:21:04+5:30
एका बसमधील बेवारस बॅगमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्रासोबतच देशी बनावटीचे पिस्तूल आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली : एका बसमधील बेवारस बॅगमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्रासोबतच देशी बनावटीचे पिस्तूल आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील काश्मीर गेट आयएसबीटी ते जेएनयू कॅम्पस परिसरापर्यंत धावणाऱ्या बसमध्ये पत्रासोबतच पिस्तूल आढळून आले. संबंधिताने यापूर्वी फेसबुकवरून कन्हैयाकुमार याला धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमारच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बेवारस बॅग आढळून आल्यानंतर बसचालकाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली मात्र अद्याप बॅगमालकाची ओळख पटवता आलेली नाही. यापूर्वी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या कन्हैयाकुमार आणि उमर खालीदला संपविण्याची धमकी या पत्रात दिली आहे.
जेएनयू कॅम्पसमध्ये आधीच शस्त्रधारी माणसे हजर असून ते कोणत्याही क्षणी कन्हैयाकुमारला ठार मारतील, असे यापूर्वी फेसबुकवर धमकी देणाऱ्याने म्हटले होते. दरम्यान, कन्हैयाकुमार मुंबई आणि पुण्याला येणार असल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)