रेल्वेद्वारे कोळशाचा पुरवठा वाढवा; वीज कंपनीची कोल इंडियाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:13 AM2019-06-03T04:13:27+5:302019-06-03T04:13:40+5:30
दररोज ४५ रॅकची मागणी असताना कोरबा भाग दररोज केवळ २५ रॅक भरू शकत आहे. रेल्वेमार्फत पुरवठा कमी झाल्याने त्यांना ट्रकद्वारे कोळसा मागवण्याचा महागडा मार्ग निवडावा लागत आहे.
नवी दिल्ली : छत्तीसगडच्या कोरबा भागात रेल्वेद्वारे कोळशाचा पुरवठा वाढवा, असे वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कोल इंडियाला सांगितले आहे. या कंपन्यांचे म्हणणे आहे की, यामुळे कोळशाच्या वाहतुकीचा खर्च कमी होईल व लोकांना वीज आणखी कमी दरावर मिळू शकेल.
असोसिएशन ऑफ पॉवर प्रोड्युसर्सने दिलेल्या माहितीनुसार, कोरबा भागाची देशांतर्गत कोळसापुरवठ्यात २० टक्के भागीदारी आहे; परंतु कोल इंडियाची सहकारी साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड या भागातून केवळ ५५ टक्केच पुरवठा रेल्वेद्वारे करीत आहे.
असोसिएशनने कोल इंडियाचे प्रमुख अनिल कुमार झा यांना एक पत्र लिहून सांगितले आहे की, रेल्वेऐवजी रस्त्याच्या मार्गाने कोळशाचा पुरवठा करण्याने वीज कंपन्यांना २५ टक्के जादा दराचा फटका बसत आहे.
असोसिएशनने म्हटले आहे की, दररोज ४५ रॅकची मागणी असताना कोरबा भाग दररोज केवळ २५ रॅक भरू शकत आहे. रेल्वेमार्फत पुरवठा कमी झाल्याने त्यांना ट्रकद्वारे कोळसा मागवण्याचा महागडा मार्ग निवडावा लागत आहे. रेल्वेच्या एका रॅकमध्ये ४,००० टन कोळशाची वाहतूक शक्य आहे. याचा अर्थ प्रति रॅकच्या भरपाईसाठी ३० टन वाहतुकीची क्षमता असलेल्या १३५ ट्रकची गरज आहे.
असोसिएशनने म्हटले आहे की, कोळसा वाहतुकीचा अधिकचा खर्च अखेर सर्वसामान्य ग्राहकांच्याच माथी पडत आहे. असोसिएशनने हे पत्र एचपीसीएलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक ए. पी. पांडा व रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोदकुमार यादव यांना पाठवले आहे.
कोल इंडियाचे उत्पादन मेमध्ये घटले
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोल इंडिया लिमिटेडचे उत्पादन यावर्षीच्या मे महिन्यामध्ये १.१ टक्क्याने घटले असून, ते आता ४६५.९० लाख टनांपर्यंत खाली उतरले आहे. कंपनीने शेअर बाजारात रविवारी सांगितले की, मागील वर्षी मे महिन्यात कंपनीचे उत्पादन ४७१.२० लाख टन होते. या महिन्यात कंपनीच्या कोळशाचा उठाव १.४ टक्क्याने घटून ५२०.९० लाख टनांवर आला होता. मागील वर्षी मे महिन्यात हा उठाव ५२८.१० लाख टन होता.