रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ, आयएमएने दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 09:19 AM2021-05-28T09:19:30+5:302021-05-28T09:20:09+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी रामदेव बाबा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
नवी दिल्ली : अॅलोपॅथीच्या उपचारांवर वादग्रस्त भाष्य करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी रामदेव बाबा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दिल्लीतील आयपी इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
रामदेव बाबा लसीकरणाबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी ‘आयएमए’कडून करण्यात आली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रामदेव बाबा कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवीत आहे, हा एक गुन्हा आहे. आयएमएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
‘पतंजली’चे योगगुरू रामदेव बाबा लसीचे दोन डोस घेऊनही देशात १० हजार डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. ॲलोपॅथीच्या उपचारांमुळे देशात कोरोना रुग्णांनी जीव गमावला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव यांचे हे विधान अतिशय दुर्दैवी आणि अशोभनीय आहे.
मला कोणी अटक करू शकत नाही -रामदेव बाबा
डेहराडून : सोशल मीडियावर सुरू असलेल्या अरेस्ट रामदेव या ट्रेंडवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदेव बाबा यांनी म्हटले आहे की, मला कोणी अटक करू शकत नाही.
अरेस्ट रामदेव ट्रेंडची खिल्ली उडविताना एका व्हिडिओत रामदेव बाबा म्हणतात की, मला तर त्यांचा बापही अटक करू शकत नाही.