चिंताजनक! देशात उपासमार वाढली; जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; १२१ देशांत १०७व्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 06:29 AM2022-10-16T06:29:49+5:302022-10-16T06:30:20+5:30
हा अहवाल म्हणजे देशाची प्रतिमा डागाळण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: जागतिक भूक निर्देशांक २०२२ मध्ये भारताची स्थिती आणखी खराब झाली असून, तो १२१ देशांत १०७ व्या स्थानावर घसरला आहे. गेल्या वर्षी तो १०१ व्या स्थानी होता. पाकिस्तान (९९), बांगलादेश (८४), नेपाळ (८१) व श्रीलंका (६४) या शेजारी देशांची स्थिती भारताहून चांगली आहे. आशियात केवळ अफगाणिस्तान भारताहून मागे असून, तो १०९ व्या स्थानावर आहे. सोबतच उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेल्या कुपोषित बालकांच्या प्रमाणातही भारत १९.३ टक्क्यांसह जगात सर्वात पुढे आहे.
देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न
हा अहवाल म्हणजे देशाची प्रतिमा डागाळण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली. जागतिक संकट वाढल्यानंतर स्थिती आणखी खराब होऊ शकते, असाही इशारा या अहवालात देण्यात आला.
विरोधकांची टीका
माकपचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी म्हणाले की, सरकारने साडेआठ वर्षांत भारताला अंधकारमय युगात ढकलल्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ही घसरण धोकादायक असल्याचे ट्विट त्यांनी केले. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी माननीय पंतप्रधान कुपोषणासारखे मूलभूत मुद्दे कधी हाताळणार, असा सवाल केला.
- कुपोषित ८२.०८ कोटी । जगात, २२.४३ कोटी । भारतात
- भारतातील बालमृत्यू ४.६% २०१४, ३.३% २०२०
- कुपोषणाचे प्रमाण १४.६% २०१८-२०२०, १६.३% २०१९-२०२१
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"