नोटाबंदीमुळे पती-पत्नींमध्ये वाढली भांडणं

By admin | Published: February 6, 2017 11:25 AM2017-02-06T11:25:45+5:302017-02-06T11:42:38+5:30

नोटाबंदी निर्णयामुळे पती-पत्नीच्या नात्यात कटुता आली असून घरगुती हिंसाचारातही वाढ झाल्याचा दावा मध्य प्रदेशातील एका संस्थेने केला आहे.

Increased quarrels between husband and wife due to non-voting | नोटाबंदीमुळे पती-पत्नींमध्ये वाढली भांडणं

नोटाबंदीमुळे पती-पत्नींमध्ये वाढली भांडणं

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 -   नोटाबंदी निर्णयामुळे पती-पत्नीच्या नात्यात कटुता आली असून घरगुती हिंसाचारातही वाढ झाल्याचा दावा मध्य प्रदेशातील एका संस्थेने केला आहे. पती-पत्नींमधील भांडण सोडवण्यासाठी समुपदेशनाचे कार्य करणा-या संस्थांमध्ये घरगुती हिंसाचाराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
नोटाबंदी निर्णयामुळे केवळ सर्वसामान्य आणि शेतकरीच हैराण झाले नसून, पती-पत्नीमधील वादही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, असा दावा ‘गौरवी-वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ या मध्य प्रदेशातील संस्थेने केला आहे. ही संस्था पती-पत्नींमधील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावते. या संस्थेच्या अध्यक्षा सारिका सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नोटाबंदी निर्णयानंतर मध्य प्रदेशात पती-पत्नीमधील भांडणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे'.
 
सारिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी निर्णयाची घोषणा झाल्यानंतर दाम्पत्यांमधील वादाची अशी अनेक प्रकरण संस्थेत दाखल करण्यात आली आहेत, ज्यात महिलांनी काटकसर करुन स्वतःकडे ठेवलेल्या 500, 1000 रुपयांच्या नोटा बदलून आणण्यासाठी आपल्या पतीकडे सोपवल्या, मात्र यानंतर पतीने ते पैसे पत्नीला परत केलेच नाहीत. यामुळे पती-पत्नीमध्ये तू-तू-मै-मै होऊ लागली आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला.
 
सारिका यांनी असेही सांगितले की, काही प्रकरणांमध्ये पत्नी वर्गाकडून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 30 डिसेंबरनंतर समोर आल्या. यामुळे त्या दाम्पत्यांमध्ये शाब्दिक खटके उडून मारहाणदेखील होऊ लागली. सध्या समुपदेशन केंद्रांमध्ये पती-पत्नींमध्ये समेट घडवून आणून भांडण संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गौरवी संस्थेच्या संचालिका शिवानी सैनी यांनी सांगितले की, नोटाबंदी पूर्वी संस्थेत 50 प्रकरणं येत होती. तर नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 पर्यंत भोपाळमधील गौरव संस्थेत घरगुती हिंसाचाराची जवळपास 200 प्रकरणं नोंदवण्यात आली. 
 
यातील सर्वाधिक वाद नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन तुटवडा आणि यातून  झालेल्या मारहाणीची होती. सैनी यांनी असेही सांगितले की, घरगुती हिंसाचार पूर्वीही होता मात्र नोटाबंदीनंतर यात अधिक प्रमाणात वाढ झाली आहे.
 

Web Title: Increased quarrels between husband and wife due to non-voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.