सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:37 AM2024-06-15T06:37:11+5:302024-06-15T06:37:51+5:30
Social Media: फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब यांसारखी समाजमाध्यमे सध्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी आहेत. नियंत्रण नसल्याने मोकळेपणाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे. त्यामुळे कौटुंबिक संस्कार मोडीत निघाले असून मुले बिघडत आहेत.
नवी दिल्ली - फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब यांसारखी समाजमाध्यमे सध्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी आहेत. नियंत्रण नसल्याने मोकळेपणाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे. त्यामुळे कौटुंबिक संस्कार मोडीत निघाले असून मुले बिघडत आहेत.
अभ्यासाच्या नावाखाली मुले अधिकाधिक वेळ मोबाइलवर रील आणि शॉर्ट्स पाहत आहेत. याचा सर्वांत घातक परिणाम म्हणजे मुलांचा त्यांच्या कुटुंबाशी असलेला संवाद सतत कमी होत चालला असल्याचे समोर आले आहे. मुलांच्या मनात गुन्हेगारी विचार वाढत आहेत. आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण असायला हवे असे ९३ टक्केपेक्षा अधिक लोकांनी म्हटले आहे.
लोक म्हणतात होय...
या सर्व मुद्द्यांवर राजस्थानमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सहभागी ९७ टक्केपेक्षा अधिक लोकांनी सोशल मीडिया अश्लीलतेला प्रोत्साहन देत असल्याचे मान्य केले. याचा मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत आहे.
९३ टक्के जणांनी नको ती पोस्ट पाहिली
सर्वेक्षणात सहभागी ९३ टक्के लोकांनी मान्य केले की समाजमाध्यमांवर त्यांनी कोणती ना कोणती आक्षेपार्ह पोस्ट पाहिली आहे. रील बनविण्याच्या स्पर्धेलाही ९४ टक्के जणांनी चुकीचे असल्याचे म्हटले.