काश्मिरात आयएसचा वाढता प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:47 AM2018-09-17T00:47:10+5:302018-09-17T06:53:28+5:30
काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा नगण्य प्रभाव असल्याचा पोलिस दावा करीत असले तरी या संघटनेचा तेथील लोकांवरील प्रभाव आणि पसाराही वाढत असल्याचे तेथील घटनांवरुन दिसते.
नवी दिल्ली/श्रीनगर : काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा नगण्य प्रभाव असल्याचा पोलिस दावा करीत असले तरी या संघटनेचा तेथील लोकांवरील प्रभाव आणि पसाराही वाढत असल्याचे तेथील घटनांवरुन दिसते.
पुलवामाच्या पंझगाम भागातील असीफ नझीर दार हा स्थानिक रहिवासी आणि त्याच्या मित्रांना सभ्य आणि धार्मिक व्यक्ती म्हणून माहिती होता. अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडलेला दार कधीही रस्त्यांवरील निदर्शनांत सहभागी नसायचा. मात्र, दार याचा मृतदेह ८ सप्टेंबर रोजी श्रीनगरच्या काश्मीर विद्यापीठ परिसराच्या बाहेर सापडला.
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाझ नायकू याच्या आदेशावरून दार याची हत्या केली गेली, असे काही संदेश इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या समाजमाध्यमांवर होते. तथापि, दुसऱ्या दिवशी असा संदेश त्यावर पोस्ट केला गेला की, दार याची हत्या ‘भारतीय संस्थांनी’ केली. नंतरच्या संदेशाला दुजोरा देताना जम्मू आणि काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दार हा इस्लामिक स्टेटच्या विचारांनी प्रभावित झालेला व काश्मीर खोºयात मारला गेलेला दहावा अतिरेकी होता, असे म्हटले. समाज माध्यमावर पोस्ट झालेल्या त्याच्या छायाचित्रात त्याच्या हाती अत्याधुनिक शस्त्र दिसते व त्याच्या मागे इस्लामिक स्टेटचा झेंडा दिसतो. काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा प्रभाव असलेल्यांची संख्या एक आकडी असल्याचा व अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत काळे झेंडेच फडकवले जात असल्याचा पोलिसांचा दावा ताज्या मृत्यूमुळे संशयास्पद ठरला आहे.
अन् पोलीस म्हणतात...
पोलिसांच्या माहितीनुसार दार ऊर्फ अबू अन्वर अल-काश्मिरी हा आयएसजेकेचा तिसरा आमिर (प्रमुख) होता.
त्या आधी गेल्या मार्च महिन्यात एईसा फाझील आणि गेल्या जूनमध्ये दाऊद अहमद सोफी हे अतिरेकी मारले गेले होते.
हिजबुलच्या तुलनेत इस्लामिक स्टेटने प्रभावित झालेल्यांची संख्या खोºयात कमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.